मुंबई विद्यापीठातील कर्मचारी तसेच महाविद्यालयातील शिक्षकांना निवडणूक कामांचे प्रशिक्षण असल्यामुळे विद्यापीठाने २८ मार्च आणि १ एप्रिल रोजीच्या परीक्षा अनुक्रमे ५ आणि १२ एप्रिल रोजी होणार होत्या. मात्र आता एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे वेळापत्रकात गुंतागुंत निर्माण झाली असून पुन्हा वेळापत्रक बदलण्यात आले
आहे.
मुंबई विद्यापीठातर्फे नव्याने जाहीर करण्यात आलेल्या या वेळापत्रकानुसार ५ एप्रिलच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. यात टीवायबीएच्या त्या दिवशी होणाऱ्या सर्व परीक्षा आता २१ मे रोजी होणार आहेत. तर त्या दिवशीची बी. फार्माच्या सातव्या सत्राची परीक्षा २६ एप्रिल रोजी होणार असून याच दिवशी होणाऱ्या टीवाबीएससीच्या सर्व परीक्षा ९ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहेत.
५ एप्रिल रोजीच्या एम.कॉमच्या स्टॅटीस्टीकल अ‍ॅनॅलेसिस या विषयाची परीक्षा आता १० एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. तर १ एप्रिल रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा आता १२ एप्रिल रोजी होणार आहे. यामध्ये बी.ए. आणि बी.एस.सीच्या गणित विषयाची परीक्षांचा समावेश नसणार आहे.
या दोन्ही शाखांच्या गणित विषयाची परीक्षा रविवार १३ एप्रिल रोजी होणार आहेत. त्याचप्रमाणे १९ एप्रिल रोजी टीवायबीएच्या पाचव्या सत्राच्या तीन विषयांच्या परीक्षा आता २५ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक मुंबई विद्यापीठाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले असल्याची माहिती परीक्षा नियत्रंक डॉ. पद्मा देशमुख यांनी  दिली.