तंत्रज्ञानाचा वापर आपण खरेदीसाठी, चॅटिंगसाठी, बिल्स भरण्यासाठी, वृत्तपत्र वाचण्यासाठी करत असतो, पण याच तंत्रज्ञानाचा वापर आपण शिक्षणासाठी करू शकतो का? माहिती आणि संभाषण तंत्रज्ञानामुळे शिकणे आणि शिकविणे या दोन्ही प्रक्रियाही आता अगदी सोप्या आणि सहज झाल्या आहेत. याचा अनुभव आयआयटी मुंबईने सुरू केलेल्या www.spoken-tutorial.org या संकेतस्थळावरून येत आहे. या ठिकाणी आपल्याला अवघड वाटणाऱ्या संगणकीय भाषा अगदी आपल्या मातृभाषेत शिकविल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजावून घेणे अधिक सोपे होते. आयआयटी मुंबईच्या रसायन अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक कन्नन मोऊडग्याल यांनी हा प्रकल्प सुरू केला असून, या माध्यमातून अधिकाधिक लोकांना शिक्षण देण्याचा त्यांचा उद्देश आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण प्रोग्रामिंग भाषा, ऑफिस टूल्स, ग्राफिक आणि सíकट डिझाइन टूल्स शिकू शकतो. यामध्ये ऑडिओ टय़ुटोरिअल्स देण्यात आले आहेत. या उपक्रमाला माहिती आणि संभाषण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण या राष्ट्रीय अभियानांतर्गत निधी मिळाला आहे. या निधीमुळे विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम विनाशुल्क उपलब्ध करून देणे शक्य झाल्याचे मोऊडग्याल यांनी सांगितले. स्पोकन टय़ुटोरिअलमुळे शिकविण्याचा वेळ खूप कमी होतो. ‘सी’सारख्या संगणकीय भाषा शिकायला केवळ ३० ते ४० तासांचा अभ्यासक्रम पुरतो. ही भाषा शिकण्यासाठी प्रत्येकी दहा मिनिटांचे २० ऑडिओ टय़ुटोरिअल या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी या संकेतस्थळावर कोडिंग करू शकतात, इतकेच नव्हे तर काही प्रोग्राम्सही तयार करू शकतात, अशी माहितीही मोऊडग्याल यांनी दिली. या माध्यमातून केवळ विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणे हा एकमेव उद्देश नसून त्यांनी चांगले गुण मिळवून चांगल्या प्रकारची नोकरी मिळवावी हाही उद्देश असल्याचे ते सांगतात. याचा वापर केवळ संगणकीय शिक्षणापुरता मर्यादित न ठेवता इतर शिक्षणासाठीही तो वापरात यावा, अशी आशाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.