क्रमिक पाठय़पुस्तकासोबत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीचे संवर्धन व्हावे यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत शिक्षण निरीक्षक उत्तर विभागाच्या वतीने मुंबईत सोमवार ते बुधवार या कालावधीत ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजीव तांबे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
कुर्ला येथील शा. कृ. पंत वालावरकर माध्यमिक विद्यालयात होणाऱ्या या ग्रंथ महोस्तवात अनेक प्रकाशक सहभागी होणार असून विद्यार्थ्यांसाठी ग्रंथिदडी, परिसंवाद, लेखक आपल्या भेटीला, काव्यसंमेलानाचेही आयोजन करण्यात आले आहे. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथ िदडी निघणार असून शिक्षक आमदार रामनाथ मोते यांच्या हस्ते िदडीला सुरुवात होईल. ग्रंथ महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २४ तारखेला दुपारी २ वाजता शिक्षणातील ‘नवे प्रयोग’ या विषयावर राजीव तांबे यांचे व्याख्यान असून ३.३० वाजता विद्यार्थ्यांच्या ताण-तणावावर दीपाली केळकर ‘मनप्रसन्न’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शिक्षक व विद्यार्थ्यांचे कवी संमेलन ११ वाजता कथाकथनकार एकनाथ आव्हाड कथा-कवितांची मफल सादर करणार आहे. दुपारी २ वाजता लेखिका/कवयित्री प्रा. प्रज्ञा दया पवार यांची मुलाखत प्रतिभा सराफ घेणार आहेत. २६ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता ‘आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती रुजविण्याचे शिक्षकापुढील आव्हान’ या परिसंवादात किरण सोनावणे व चंद्रशेखर गग्रे सहभागी होणार आहेत. सकाळी ११.३० वाजता मराठी, इंग्रजी म्हणी व वाक्प्रचारांच्या गमतीदार कथा प्रा अरुण मड सादर करणार आहे. दुपारी ३ वाजता भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जीवन चरित्रपट चेंबूरमधील स्वामी मुक्तानंद हायस्कूलचे विद्यार्थी उलगडणार आहेत. मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर विभागातील सुमारे ४०० शाळांचे शिक्षक, ग्रंथपाल व विद्यार्थी या  ग्रंथ महोत्सवाला भेट देणार आहे, अशी माहिती उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांनी  दिली.