शैक्षणिक वाटचाल ठरविताना दहावीला अनन्य साधारण महत्व आहे. यावेळी घेतलेले निर्णय आपल्याला पुढील दिशा दाखवतात. तर बारावीने त्यावर शिक्कामोर्तब होते. त्यामुळे या दोन्ही वेळी अनेकदा निर्णय घेताना विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही मन:स्थिती दोलायमान असते. नेमके आवडते क्षेत्र आणि त्यानुरूप शिक्षण नेमके कोणते घ्यायचे, हे ठरविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला तज्ज्ञ मार्गदर्शनाची गरज भासते. त्याचसाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘लोकसत्ता- मार्ग यशाचा’ या उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. या गुरुवार आणि शुक्रवारी या उपक्रमाचा लाभ ठाण्यातील विद्यार्थी आणि पालकांना मिळणार आहे.
ठाणे पश्चिम येथील टिपटॉप प्लाझा येथे विद्यालंकार प्रस्तुत आणि आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्सच्या सहकार्याने हा परिसंवाद होणार आहे. दहावी-बारावीनंतरच्या विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांची आणि करिअर निवडीच्या तंत्रांची सविस्तर ओळख या परिसंवादातून करून देण्यात येईल.
नेमके कोणते करिअर निवडावे, या मुख्य प्रश्नाचा गुंता सोडवायला या परिसंवादाच्या सुरुवातीच्या सत्रात पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या करिअरविषयक विभागाच्या प्रमुख नीलिमा आपटे यांचे ‘करिअर निवडताना..’ या विषयावरील मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी नुसती पदवी उपयोगाची नसते. त्याचबरोबर नेतृत्वगुण, संभाषण क्षमता, विचार व्यक्त करण्याची कला या गोष्टींचाही प्रभाव असतो. याच सुप्त गुणांचा विकास करून करिअर कसे घडवता येते याबाबात ‘सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व आणि विकास’ या विषयावर कॉर्पोरेट ट्रेनर गौरी खेर यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर ‘दहावी-बारावीनंतरचे अभ्यासक्रम आणि करिअर संधी’ या विषयावर ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर मार्गदर्शन करतील. परिसंवादासोबतच आघाडीच्या शिक्षणसंस्थांतर्फे शैक्षणिक प्रदर्शनही होईल. डोंबिवली नागरी सहकारी बँक या कार्यक्रमाची ‘बँकिंग पार्टनर’ आहे. १८ आणि १९ जून या दोन्ही दिवसांपैकी कुठल्याही एका दिवशी उपस्थित राहण्यासाठी प्रतिव्यक्ती ५० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. यात उपस्थितांना दुपारचा लंच बॉक्सही दिला जाईल. इच्छुकांनी ऑनलाइन बुकिंगसाठी ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

कार्यक्रमाच्या प्रवेशिका पुढील ठिकाणी
सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत उपलब्ध..
*हॉटेल टिपटॉप प्लाझा, ठाणे (प.).
*विद्यालंकार- ईशान आर्केड, तिसरा मजला, हनुमान मंदिरासमोर, गोखले रोड, ठाणे (प.).
*लोकसत्ता कार्यालय, कॉसमॉस बँकेच्या वर, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.)
*संपर्क ०२२- ६७४४०३६९/३४७