‘तृतीय वर्ष वाणिज्य पदवी’ (टीवायबीकॉम) अभ्यासक्रमाच्या बुधवारी झालेल्या एटीकेटी परीक्षेमध्ये गेल्या वर्षीचीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिली गेल्याने मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा सावळागोंधळी कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.
टीवाय बीकॉमच्या (एटीकेटी) सहाव्या सत्राची ‘फायनान्स अकाऊंटिंग’ या विषयाची परीक्षा दुपारी ३ ते ५ च्या सुमारास काही निवडक परीक्षा केंद्रांवर आयोजिण्यात आली होती. सुमारे पाच हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार होते. मात्र, विद्यार्थ्यांना दिली गेलेली प्रश्नपत्रिका ही गेल्या वर्षीच्या नियमित विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेची असल्याचे लक्षात आले. अर्थात विद्यापीठाच्या गोंधळी कारभारामुळेच हा प्रकार झाला होता.सुदैवाने अध्र्या तासात हा गोंधळ विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या लक्षात आला. परंतु ६० गुणांसाठी असलेली विद्यार्थ्यांची अर्धीअधिक प्रश्नपत्रिका सोडवूनही झाली होती. परीक्षा विभागाकडमून ‘एसएमएस’वर निरोप आल्यानंतर विद्यार्थ्यांना थांबविण्यात आले.सुधारित प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारे आल्यानंतर ती फोटो कॉपी करून वाटण्यात आली. विद्यार्थ्यांचा वाया गेलेला वेळ वाढवून देण्यात आला. मात्र, या सर्व गोंधळाचा मोठा मनस्ताप त्यांना सहन करावा लागला. हा गोंधळ निस्तारेपर्यंत विद्यार्थ्यांचा अर्धाअधिक पेपर सोडवून झाला होता. नवीन प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्यांना पुन्हा नव्याने तो लिहून काढावा लागला. विद्यार्थ्यांना झालेल्या या त्रासाची भरपाई विद्यापीठ कसे करणार आहे, असा सवाल विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य व युवा सेनेचे कार्यकर्ते प्रदीप सावंत यांनी केला.