‘नीट’ आणि ‘जेईई’ या केंद्रीय प्रवेश परीक्षांप्रमाणे राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या (पीजीएम – पीजीडी-सीईटी) प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्याने या परीक्षांमध्ये यंदा पारदर्शकता आणणे शक्य झाले आहे. त्याचा फायदा संदिग्ध व चुकीचे प्रश्न रद्द होऊन पीजीएम व पीजीडी या दोन्ही सीईटींकरिता विद्यार्थ्यांना प्रत्येकी सातसात गुणांचे ‘दान’ मिळण्यात झाला आहे.
वैद्यकीयसाठी पीजीएम-सीईटी आणि दंत वैद्यकीयसाठी पीजीडी-सीईटी या प्रवेश परीक्षा ५ जानेवारीला घेण्यात आल्या. परीक्षेनंतर लगेचच वैद्यकीय संचालनालयाने या परीक्षांची प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या.
या आधी उत्तरतालिका सोडाच; प्रश्नपत्रिकाही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जात नसे. कारण, परीक्षेच्या वेळेसच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून काढून घेतली जाई. एखाद्या प्रश्नाबाबत शंका असूनही विद्यार्थ्यांना त्यावर योग्य पद्धतीने व मार्गाने आक्षेप घेता येत नसे. त्यामुळे, चुकीचे प्रश्न दुर्लक्षित राहण्याची शक्यता असे. दरवर्षी या सीईंटींमधील केवळ दोन ते तीन गुणांचे प्रश्न रद्दबातल ठरून त्यांचे गुण सरसकट सर्व विद्यार्थ्यांना दिले जात. पण, यंदा पीजीएम व पीजीडी या दोन्ही सीईटींमधील प्रत्येकी सात प्रश्न अवैध ठरून रद्दबातल ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे, सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नांसाठी ७ गुण सरसकट देण्यात आले. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आल्यानेच हे शक्य झाले आहे.

अर्ज ऑनलाइन
एमएच-सीईटीसाठी यंदा पीजीएम-पीजीडी-सीईटीप्रमाणे विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षा अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यंदाची एमएच-सीईटी केंद्रीय स्तरावर गेल्या वर्षी झालेल्या ‘नीट’ या प्रवेश परीक्षेच्या धर्तीवर होणार आहे. ही परीक्षा ८ मे रोजी होईल.

 प्रश्नपत्रिका-उत्तरतालिका ऑनलाइन
पीजीएम-पीजीडी-सीईटीप्रमाणे वैद्यकीयच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘एमएच-सीईटी’ची प्रश्नपत्रिका-उत्तरतालिकाही ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एमएच-सीईटीला तब्बल १ लाख ७० हजारांच्या आसपास विद्यार्थी बसतील अशी अपेक्षा आहे. या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एमएच-सीईटीची प्रश्नपत्रिकाही परीक्षा झाल्यानंतर लगेचच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.