पाचव्या वेतन आयोगानुसार पूर्णवेळ शिक्षकांना लाभ
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील अशासकीय अनुदानित शाळांमधील व्यवसाय अभ्यासक्रम तसेच द्विलक्षी अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांमधील पूर्णवेळ शिक्षकांना पाचव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील अशासकीय अनुदानित शाळांतील व्यवसाय अभ्यासक्रम तसेच द्विलक्षी अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थेतील पूर्णवेळ शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील उच्च माध्यमिक शिक्षकांप्रमाणे त्रिस्तरिय वेतनश्रेणी एक मार्च २००० पासून लागू करण्यात आली होती. मात्र शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील शिक्षकांना २६ फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार १ जानेवारी १९९६ पासून वेतनश्रेणी लागू करण्यात आली होती. ही तफावत दूर करण्यासाठी अशासकीय अनुदानित शाळांतील व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांतील पूर्णवेळ शिक्षकांनाही ही वेतनश्रेणी १ जानेवारी १९९६ पासून लागू करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.

निर्णय १ एप्रिल २०१४ पासून लागू
सुधारित वेतनश्रेणीचा हा निर्णय १ एप्रिल २०१४ पासून लागू होणार असून शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील शिक्षकांप्रमाणेच पाचवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयामुळे खासगी व्यवसाय अभ्यासक्रम संस्थांमधील पूर्णवेळ शिक्षकांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे.