scorecardresearch

‘फ्रेशर्स पार्टी’ करणाऱ्या ‘व्हीजेटीआय’च्या दोन विद्यार्थ्यांची वसतिगृहातून गच्छंती

यंदाही नवागत विद्यार्थ्यांकडून त्यांच्या ऐच्छिक स्वरूपात वर्गणी जमा करून पार्टीेचे आयोजन करण्यात आले होते.

 

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांकरिता ‘फ्रेशर्स पार्टी’च्या आयोजनात पुढाकार घेतला म्हणून माटुंग्याच्या ‘वीर जिजामाता तंत्रशिक्षण संस्थे’च्या (व्हीजेटीआय) दोन विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचा तडकाफडकी आदेश देण्यात आला आहे. मुळात विद्यार्थ्यांनी ही पार्टी संस्थेच्या आवारात आयोजित केलीच नव्हती. संस्थेने पार्टीच्या आयोजनला नकार दिल्याने विद्यार्थ्यांनी माटुंग्याच्या एका हॉलमध्ये ११ ऑगस्टला या पार्टीचे आयोजन केले होते. मात्र, नवागत विद्यार्थ्यांशी पूर्वपरवानगीशिवाय संपर्क साधून पार्टीचे आयोजन केलेच कसे अशी भूमिका घेत संस्थेने थेट कारवाईचा बडगा उगारल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

इतर कोणत्याही महाविद्यालयाप्रमाणे ‘व्हीजेटीआय’मध्ये नवागत विद्यार्थ्यांकरिता पार्टीचे आयोजन केले जात होते. परंतु, तीन वर्षांपूर्वी संस्थेने परवानगी नाकारल्याने गेली दोन वर्षे विद्यार्थी बाहेर एखादा हॉलकरून पार्टीेचे आयोजन करतात. यंदाही नवागत विद्यार्थ्यांकडून त्यांच्या ऐच्छिक स्वरूपात वर्गणी जमा करून पार्टीेचे आयोजन करण्यात आले होते. माटुंग्याच्या एका हॉलमध्ये सायंकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान पार्टी आटोपून वसतिगृहात राहणारे विद्यार्थी परतले. परंतु, दुसऱ्याच दिवशी या पार्टीच्या आयोजनाता पुढाकार घेणाऱ्या संस्थेच्या सोशल ग्रुपचा प्रमुख आणि खजिनदार असलेल्या दोन तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टपर्यंत वसतिगृह सोडण्याचे पत्र देण्यात आले.

पार्टीच्या ठिकाणी काही आक्षेपार्ह असे काहीच घडले नव्हते. बर्गर, समोसा, शीतपेये असे खाद्यपदार्थ होते. नव्या-जुन्या विद्यार्थ्यांनी आपापली ओळख यावेळी करून दिली. नवागतांना संस्थेची माहिती देणारे सादरीकरण यावेळी करण्यात आले. थोडीफार मजा मस्ती केल्यानंतर आम्ही परत आलो, असे या पार्टीत सहभागी झालेल्या एका विद्यार्थ्यांने सांगितले.

अजून काढलेले नाही

मुळचे औरंगाबाद आणि लातूर येथे राहणारे हे दोन्ही विद्यार्थी अत्यंत सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे मुंबईत नातेवाईक नाहीत. त्यामुळे, वसतिगृह सोडायचे म्हटले तर ते कुठे राहणार, असा सवाल या कारवाईला विरोध असलेल्या एका प्राध्यापकांनी केला. या संबंधात संस्थेचे संचालक डॉ. ओमप्रकाश काकडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ‘प्रतिबंधात्मक उपाय’ म्हणून ही कारवाई केल्याचे स्पष्ट केले. तसेच, आम्ही केवळ विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे पत्र दिले आहे. त्यांना अद्याप काढण्यात आलेले नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज ( Kgtocollege ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vjti college two student suspended due to freshers party

ताज्या बातम्या