कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गुरुवारी २५ रुग्ण करोना सकारात्मक असल्याचे आढळले. जिल्ह्यात काल चारशेचा टप्पा ओलांडला होता. आता आकडा ४२७ झाला आहे.

दरम्यान करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या दोन दिवसात १३ रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी गुरुवारी दिली. आत्तापर्यंत ४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान, नवी दिल्ली येथून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांंचे करोना चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत. राजधानीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेलेले ४५ विद्यार्थी गेल्या आठवडय़ात कोल्हापुरात परत आले. त्यातील पहिल्या १८ जणांची चाचणी नकारात्मक होती. कालचे दहा जणांच्या अहवालासह सर्वच विद्यार्थ्यांंचे अहवाल नकारात्मक आले आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांंना व त्यांच्या कुटुंबीयांना धीर मिळाला आहे.

कोल्हापुरात तटरक्षक दलाकडून पाहणी

गतवर्षीचा महापुराच्या आणि आगामी पावसाळ्यातील बचाव पूर्वतयारीकरिता भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा कमांडंट अमित कोरगावकर आणि कमांडंट अशोक यादव यांनी कोल्हापूर, रत्नागिरी परिसर आणि कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली. विमानतळावरील अनुषंगिक सर्व सेवा आगामी पावसाळ्याला सामोरे जाण्यासाठी उपलब्ध असल्याचे दिसून आल्याने पावसाळ्यात कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर विमानतळ पूर्णपणे सक्षम असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.