समकालीन विषयाला साद घालणाऱ्या एकांकिकांची बाजी

कोल्हापूर : समकालीन विषयाला साद घालणाऱ्या पाच वैविध्यपूर्ण एकांकिका ‘लोकसत्ता लोकांकिका’ विभागीय अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या. विभागीय अंतिम फेरी १७ डिसेंबरला कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे रंगणार असून त्यातील विजेती एकांकिका मुंबई येथे होणाऱ्या महाअंतिम स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. कोल्हापूर केंद्रात आज पाच एकांकिका सादर झाल्या.

कोल्हापूरच्या सर्व अधिविभाग शिवाजी विद्यापीठ  संघाने ‘ती यशोधरा उरली फक्त’ या एकांकिकेत बुद्ध आणि यशोधरा यांच्यातील वैचारिक संवादातून शांतीचा मार्ग कसा शोधता येईल हे दाखवून दिले. इचलकरंजीच्या दत्ताजीराव कदम आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाने उपेक्षित गारुडी समाजातील दोन पिढय़ांमधील  श्रद्धा, अंधश्रद्धा, व्यवसाय याचे दर्शन घडविले.

कोल्हापुरातील भारती विद्यपीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने ‘भोंडला’ मधून स्त्रीमनाच्या भावना, लैंगिकता यांच्यातील वैचारिक आलेख दर्शवणाऱ्या धाडसी विषयाचा धांडोळा घेतला. कराड येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाने कर्करोगग्रस्त पत्नी मृत्युशय्येवर असताना पतीला बंधमुक्त करण्याचा आग्रह धरणारी वेगळ्या पद्धतीची एकांकिका सादर केली.

इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाने विदेशात राहणारी पिढी मृत्यूचाही इव्हेंट कसा साजरा करू पाहते यावर ‘एक्सपायरी डेट’ या एकांकिकेतून प्रखर प्रकाश टाकला. प्रमोद काळे(पुणे) आणि संजय हळदीकर (कोल्हापूर) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

व्यापक संधी

‘लोकसत्ता’ने ‘लोकांकिका’च्या माध्यमातून महाविद्यालयीन युवक-युवतींना नाटय़क्षेत्रात कलागुण सादर करण्याची व्यापक संधी दिली आहे. यातून अनेक गुणी कलाकार, लेखक, दिग्दर्शक आदींचा शोध लागतो आहे. अशा अनेकांना ‘आयरिश प्रोडक्शन’चे विद्याधर पाठारे यांनी कलाक्षेत्रात पुढे जाण्यास मदत केली आहे. दोघांनीही हा उपक्रम सुरु ठेवून उदयोन्मुख कलाकार घडवण्यास मदत करावी.  – रोहिणी परळकर, आयरिश प्रोडक्शन थेट व्यासपीठ कलाविषयक जाणीव, गुणवत्ता याचा शोध नेमका कोठे लागेल हे सांगता येत नाही. ज्यांना थेट व्यासपीठ मिळते असे कलाकार कमी असतात. या परिघाच्या बाहेर कलाविष्कार सुप्त अवस्थेत असणारे अनेक जण आहेत. अशांचा शोध आणि संधी उपलब्ध करून देण्याचे काम आयरिश प्रॉडक्शनच्या माध्यमातून होत आहे.

 – अभय परळकर, आयरिश प्रॉडक्शन प्रतिनिधी

उपक्रम कौतुकास्पद

नाटक हे माणसातील संवेदनशीलता जगवण्याचा प्रयत्न करते.  नाटकाकडे गंभीरपणे पाहणारा तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणात       आहे. त्यांना जाणवणाऱ्या अडचणी तो नाटय़ाद्वारे प्रकट करू  इच्छितो. अशा धडपडणाऱ्या तरुणाईला ‘लोकसत्ता लोकांकिका’ हा    उपक्रम कौतुकास्पदच नव्हे         तर प्रेरणा देणारा आहे.

– संजय हळदीकर, परीक्षक

मन:पूर्वक प्रतिसाद

लोकसत्ता लोकांकिका या सातत्यपूर्णतेने राबवल्या जाणाऱ्या उपR मामुळे महाराष्ट्रातील अनेक दुर्लक्षित भागातील नाटय़ चळवळीला किती मन:पूर्वक प्रतिसाद मिळतो याची ओळख पटली. संहिता निवड आणि त्यातील आशयासह सादरीकरण याचा तरुण पिढी सुयोग्य पद्धतीने विचार करत असल्याचे दिसून आले.

 – प्रमोद काळे, परीक्षक

विभागीय अंतिम स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या एकांकिका

१. एक्सपायरी डेट ( राजारामबापू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर)

२. भोंडला (भारती विद्यापीठ, कोल्हापूर)

३. ती यशोधरा उरली फक्त (सर्व अधिविभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

४. तिलांजली (विवेकानंद महाविद्यलय, कोल्हापूर)

५. मोठ्ठा पाऊ स आला आणि.. (दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरुंदवाड)

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या उपक्रमासाठी प्रक्षेपण भागीदार देखील आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.