News Flash

कोल्हापूर जिल्हा बँकेकडून पीक कर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती

केंद्र शासनाचे पीक कर्जाचे निकष पूर्ण करण्यात ही मागणी सुमारे १० टक्के कमी आहे.

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : राज्यातील पीक कर्ज मागणी घट होत असल्याचे चित्र दिसत असताना कोल्हापुरात मात्र सातत्याने कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती होताना दिसत आहे. कर्जवाटपात अग्रस्थानी असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेली अनेक वर्षे उद्दिष्टाच्या दीडपटपेक्षाही अधिक पूर्तता केली आहे.

राज्यात या वर्षी पीक कर्जाची मागणी मागील वर्षीपेक्षा ११ टक्कय़ांनी कमी आहे. केंद्र शासनाचे पीक कर्जाचे निकष पूर्ण करण्यात ही मागणी सुमारे १० टक्के कमी आहे. असे असताना कोल्हापूर जिल्ह्य़ातील गेली अनेक वर्षे पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होत असल्याचे दिसत आहे. कोल्हापूर जिल्हा हा कृषिप्रधान आहे. ऊस, भात, सोयाबीन ही जिल्ह्य़ातील मुख्य पिके असून एकूणच पीक कर्जाची मागणी वाढत असते. सन २०२०-२१ वर्षांत फेब्रुवारी महिना अखेर २४८० कोटी रुपये उद्दिष्ट असताना २५८४ कोटी म्हणजे १०४ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली होती. राज्यात पीक कर्ज वाटपात कोल्हापूर प्रथम स्थानी आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे योगदान हे राष्ट्रीयीकृत व्यापारी बँकापेक्षा दरवर्षी अधिक राहिले आहे.

कर्जवाटपाचा उंचावता आलेख

कोल्हापूर जिल्हा बँकेची गेल्या दशकभरातील कर्जवाटपाची आकडेवारी पाहिली तरी त्यातील प्रगती अधोरेखित होते. सन १०११-१२ या वर्षांत ८५० कोटी रुपये उद्दिष्ट असताना ९५३ कोटी रुपये वाटप केले. २ लाख १४ हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना ११२ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. २०१३-१४ या वर्षांत पीक कर्जवाटपाचा एक हजार कोटीचा आकडा ओलांडला होता. या वर्षी ११७५ कोटीचे उद्दिष्ट असताना १ लाख ८६ हजार शेतकऱ्यांना ११८८कोटी कर्जवाटप (१०१ टक्के) होते. सन २०१५-१६ मध्ये बँकेत प्रशासक कारकीर्द संपून संचालक मंडळाचा कारभार सुरू झाल्यावर कर्जवाटपात झपाटय़ाने वाढ झाली. या वर्षी ९०० कोटीचे उद्दिष्ट असताना १४१३ कोटी कर्जवाटप झाले.दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना १५७ टक्के कर्ज वाटप झाले. २०२०-२१ या वर्षांत विक्रमी म्हणजे २३८९कोटी कर्ज वाटप केले. १३७१ कोटी उद्दिष्ट होते; पण तब्बल १७४ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. यंदा नुकताच कुठे खरीप हंगामाच्या पीक कर्जवाटपाला सुरुवात झाली आहे. तरीही जूनच्या पहिल्या आठवडय़ात ५७ टक्के कर्जवाटप झाले आहे. २०२१-२२ या वर्षांसाठी खरीप कर्ज ८७५ कोटीचे उद्दिष्ट १७५० कोटी असून आतापर्यंत ४९६ कोटी रुपये कर्जवाटप झाले आहे. ‘जिल्हा बँकेशी १९०० सेवा सहकारी संस्था जोडल्या असून याद्वारे शेतकरी पीक कर्ज घेत असतात. ३ लाखापर्यंत पीक कर्ज शून्य व्याजाने देण्याचा निर्णय आधीच घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या वर्षीही बँकेची उद्दिष्टापेक्षा अधिक पूर्तता होईल,’ असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने यांनी सांगितले.

तोटय़ाचे अर्थकारण; तरीही ..

कृषी अवजारे, विहीर खुदाई, १ कोटीचे ऊस तोडणी यंत्र ,दुभती जनावरे तसेच गृह, देश- विदेशातील उच्च शिक्षण, लग्न, वैद्यकीय उपचार, वाहन खरेदी आदी कृषि आणि दैनंदिन गरजांसाठी सर्व प्रकारचे कर्ज दिले जात असल्याने शेतकरी जिल्हा बँकेलाच कर्जासाठी प्राधान्य देत असतो. परिणामी बँकेची आर्थिक उलाढाल वाढत चालली आहे.

‘१०३ कोटींचा संचित तोटा असलेल्या बँकेला यंदा १३५ कोटी रुपये नफा झाला असून त्यात शेतकऱ्यांचे योगदान अधिक आहे. बँकेने सन २०२०-२१ या वर्षांत ३२ कोटी रुपये तोटा सहन करून पीक कर्ज पुरवठा केला होता. याबाबत नफा नुकसानीचा विचार न करता ते अधिकाधिक देण्यात कोणतीही कसर ठेवली जात नाही,’ असे बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 11:59 am

Web Title: achieving the objective of distribution of crop loan from kolhapur district bank zws 70
Next Stories
1 वाढीव संसर्गदरामुळे कोल्हापूरकरांना दिलासा नाही
2 ‘निवडणुकीबाबतचे अधिकार वरिष्ठ नेत्यांना’
3 संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली आरक्षण आंदोलन यशस्वी होईल – हसन मुश्रीफ
Just Now!
X