कुमुदा शुगर्सचे उपाध्यक्ष श्रीकांत नलवडे यांना झालेल्या अटकेच्या कारवाईमुळे कुमुदा शुगर्सच्या अस्तित्वाबरोबरच साखर उद्योगातील या महत्त्वाच्या समूहाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबरोबर केलेल्या दौलत सहकारी साखर कारखाना चालवायला घेण्याच्या करारावर टांगती तलवार लागली आहे. कुमुदा शुगर्सची बिघडलेली आíथक स्थिती पाहता दौलतचे धुराडे पेटण्याची शक्यता अंधूक बनली आहे. तर हा मुद्दा तापता ठेवत विरोधकांनी कुमुदा शुगर्सबरोबर झालेला दौलतचा करार जिल्हा बँकेने रद्द करावा यासाठी मोच्रेबांधणी सुरु ठेवली आहे. कराराचे भवितव्य काय होणार यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
उत्तर कर्नाटकात कुमुदा शुगर्स अॅग्रो प्रॉडक्ट या कंपनीने साखर उद्योगामध्ये दबदबा निर्माण केला आहे. या समूहाने अल्प काळात कर्नाटक, महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखाने चालविण्यासाठी घेतले. सुरवातीचा उभरता काळ वगळता नंतर कुमुदा शुगर्सबाबत तक्रारींचा पाढा सुरु झाला. सोलापूर जिल्हयातील माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बार्शी येथील आर्यन साखर कारखान्यातील  ११२ कोटीच्या कर्जे व्यवहाराविरोधात सोलापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात कुमुदा शुगर्सचे अध्यक्ष अविनाश भोसले, उपाध्यक्ष श्रीकांत नलवडे यांच्यासह संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून भोसले-नलवडे हे पोलिसांना गुंगारा देत राहीले. उपाध्यक्ष नलवडे यास हुपरी, ता. हातकणंगले येथून सोलापूर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. पोलिस भोसले यांच्या शोधात आहेत.
भोसले-नलवडे यांच्या विरोधात दाखल झालेले विविध ठिकाणचे गुन्हे, न्यायालयातील वेगवेगळे दावे यामुळे कुमुदा शुगर्सच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसी कारवाई सुरु असताना कोल्हापूर जिल्हयात गंभीर परिणाम संभवत आहेत. कुमुदा शुगर्सने शाहूवाडी तालुक्यातील उदयसिंहराव गायकवाड कारखाना भाडेतत्वावर घेतला होता. कुमुदा शुगर्सने गायकवाड कारखान्याला दिलेला भाडयाचा रकमेचा आगाऊ धनादेश वटला नाही. त्यावरुन न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली आहे.
चंदगड तालुक्यातील दौलत साखर कारखाना चालविण्यास घेण्यासंदर्भात कुमुदा शुगर्सने जिल्हा मध्यवर्ती बँकेला करारासाठी इच्छुक असल्याचे पत्र दिले आहे. त्यातील पहिले २५ कोटी रुपये ३० जानेवारी अखेर भरण्याचे भोसले यांचे म्हणणे आहे. आता उपाध्यक्ष अटकेत असून भोसले यांच्या हाती कधीही बेडया पडण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा बँकेबाबतच्या कराराची रक्कम मिळण्याची शक्यता मावळतीकडे झूकू लागली असल्याने दौलतच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. दौलत कारखाना कुमुदा शुगर्सला चालवायला देण्याबाबत कारखान्याचे माजी अध्यक्ष, माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांनी कडाडून विरोध करीत करारादिवशीच जिल्हा बँकेला निवेदन देऊन अनेक कारखान्यांना टोप्या घालणाऱ्या कुमुदाशी व्यवहार करु नये, असा इशारा दिला होता. त्यावर बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पाटील यांचे वाभाडे काढणारे पत्र काढले होते. पण त्या पत्रात कुमुदाच्या आíथक सक्षमतेबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांना सोईस्करपणे बगल दिली होती.
कुमुदा शुगर्सचे बेळगाव जिल्हयात नाव बदनाम झाले आहे. महाराष्ट्रातही त्याच्या खुणा दिसू लागल्या आहेत. या वास्तवाकडे कानाडोळा करुन पुन्हा त्याच कुमूदाकडे दौलत चालवायला दिल्याने काहीही साध्य होणार नाही. शेतकऱ्याचे कोटयावधी रुपयांचे देणे बाकी असताना पुन्हा नव्याने शेतकऱ्याचा गळा कापण्यास परवानगी देणे सर्वथा अयोग्य असून भ्रष्ट व्यवहाराविरोधात लढा सुरु राहणार असल्याचे नरसिंग पाटील यांनी शुक्रवारी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. तर बँकेचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी महिनाअखेर पर्यंत कुमुदाकडून पसे ठरल्याप्रमाणे पसे येतात का ते पाहू आणि त्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले.