माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील कृषिभूषण गणेश भालचंद्र कुलकर्णी (४५) यांचा राजकीय द्वेषभावनेतून निर्घृण खून केल्याच्या खटल्यात राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित सर्व पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोषमुक्तता करण्यात आली. सोलापूरच्या सत्र न्यायालयाने सोमवारी दुपारी या खटल्याचा निकाल जाहीर केला.
संदीप विष्णुपंत पाटील (३०), संतोष भगवान कदम (३८) व सिद्धेश्वर भारत पाटील (३३) रामलिंग माणिक हराळे (३८, सर्व रा. उपळाई खुर्द) व प्रवीण सुनील मोटे (३३, रा. कुंभारी, ता. तुळजापूर, जि.उस्मानाबाद) अशी निर्दोष सोडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी.अग्रवाल यांनी या खटल्याचा निकाल जाहीर केला. या खटल्यात अगोदर पाच-दहा आरोपींची नावे होती. परंतु पोलीस तपास अधिकाऱ्यांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोप न्यायालयात दाखल करताना त्यातील पाच आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा आढळून न आल्यामुळे त्यांना दोषारोपपत्रातून वगळण्याची विनंती न्यायालयास केली होती. त्यानुसार दीपक लखोजी पाटील, अण्णासाहेब शिवाजी पाटील, भाऊसाहेब विष्णुपंत पाटील, महादेव मारुती कदम व सुरेश वसंतराव पाटील या आरोपींना खटल्यातून वगळण्यात आले होते.
कृषिभूषण गणेश कुलकर्णी यांनी २०१० साली झालेली उपळाई खुर्द ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली होती. त्यात बाजी मारून त्यांनी उपसरपंचपद मिळविले होते. मागील ४० वर्षांपासूनची प्रस्थापित पाटील गटाची सत्ताही गेली होती. शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याने शासनाने कुलकर्णी यांना कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरविले होते. केंद्रीय स्पर्धा परीक्षा दिलेले गणेश कुलकर्णी हे उपळाई खुर्द व परिसरात कमालीचे लोकप्रिय झाले होते. यातच आगामी जिल्हा परिषद व तालका पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षणात माढा गट व गण सर्वसाधारण गटासाठी खुला झाला. त्यामुळे प्रतिष्ठा व लोकप्रियतेमुळे कुलकर्णी हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही निवडून येतील, अशी विरोधक पाटील गटाला धास्ती होती. त्यातूनच गावातील त्यांचे विरोधक संदीप पाटील व इतरांनी कुलकर्णी यांचा काटा काढण्याचे ठरविले. त्यासाठी सोलापूर व उपळाई खुर्द गावात त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांचा खून करण्याचा कट रचला गेला. अखेर १४ ऑक्टोबर २०११ रोजी उपळाई खुर्द येथे गणेश कुलकर्णी हे एकटेच आपल्या शेताजवळील रस्त्यावरून जात असताना आरोपी संदीप पाटील यांच्या सांगण्यावरून संतोष कदम याने महिंद्रा झायलो गाडी (एमएच २५ आर ६१००) कुलकर्णी यांच्या अंगावर घातली. यात ते गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा प्रकार काही जणांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला होता. या प्रकरणी मृत गणेश कुलकर्णी यांच्या पत्नी ज्योती कुलकर्णी यांनी माढा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील आरोपी हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असून एका बडय़ा लोकप्रतिनिधीचे जवळचे नातलग आहेत. या खूनप्रकरणामुळे माढा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ात खळबळ माजली होती.
या खटल्याची सुनावणी सोलापूरच्या सत्र न्यायालयात अनेक दिवस चालली. विशेष सरकारी वकील अरविंद अंदोरे यांनी २९ साक्षीदार तपासले. यात मृताची पत्नी ज्योती कुलकर्णी यांच्यासह नेत्रसाक्षीदार आनंद कदम, शहाजी पाटील, अनिल कदम, दत्तात्रेय कचरे, पोलीस तपास अधिकारी अप्पासाहेब शेवाळे यांचा समावेश होता. आरोपींतर्फे ज्येष्ठ वकील धैर्यशील पाटील यांच्यासह अ‍ॅड. भारत कट्टे व अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांनी बचाव केला. नेत्रसाक्षीदार हे कुलकर्णी गटाचे आहेत. जर त्यांनी घटना प्रत्यक्ष पाहिली असती, तर त्यांनी पोलिसांना लगेचच कळविले असते. परंतु काही नेत्रसाक्षीदारांनी चार दिवस व दहा दिवसांच्या विलंबाने पोलिसांपुढे जबाब दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या साक्षीवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे, विशेष सरकारी वकिलांनी दिलेला पुरावा अविश्वसनीय आहे, ज्या दुकानात बसून आरोपींनी कुलकर्णी यांच्या खुनाचा कट रचला, त्याचा पुरावाही सरकार पक्षाला सादर करता आला नाही. घटनेदिवशी आरोपींनी एकमेकांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला, त्याचा तपशील सरकार पक्षाला देता आला नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.

Accused arrested from Pune who killed a BJP official in Karnataka pune news
कर्नाटकातील भाजप पदाधिकाऱ्याचा खून; पुण्यातून आरोपी अटकेत
Congress, Tribute, Ashok Chavan, wardha congress committee
अशोक चव्हाण यांना श्रद्धांजली? काँग्रेस कार्यालयात धक्कादायक…
Raj Thackeray Ganpat Gaikwad Shooutout
“त्या हल्ल्याला राजकीय झालर”, गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य; रोख कोणाकडे?
Sharad Pawar
तुतारी चिन्हाचं रायगडावर अनावरण, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “रणशिंग फुंकायला…”