22 January 2020

News Flash

शेट्टींसह राज्यात विरोधकांची  महाआघाडी – अशोक चव्हाण

खासदार शेट्टी यांच्या मतदारसंघात आल्यावर अनेक वक्त्यांनी त्यांना आघाडीची साद घातली.

(संग्रहित छायाचित्र)

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने नवे मित्रपक्ष जोडण्यावर भर दिला आहे. खासदार राजू शेट्टी यांना सोबत घेऊन राज्यात विरोधकांची महाआघाडी केली जाणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी हातकणंगले-शिरोळ येथे झालेल्या जाहीर सभेत केली.

खासदार शेट्टी यांच्या मतदारसंघात आल्यावर अनेक वक्त्यांनी त्यांना आघाडीची साद घातली. या बाबत चव्हाण म्हणाले, की आमची आणि शेट्टी यांची शेतकऱ्यांविषयी भूमिका एकच आहे. शेतमालाला हमीभाव, खत, बियाणे, इंधन आदींची वाढ याविषयी आमचे एकमत असताना आता भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही. स्वत: शेट्टी यांनी भाजपबरोबर गेलो ही चूक झाली असे सांगितले आहे. त्यांची माझी भेट झाली आहे. ते स्वत:हून राहुल गांधी यांना भेटले आहेत. त्यामुळे त्यांना सोबत घेण्याबरोबरच समविचारी विरोधक एकत्र करून निवडणुका लढवणार आहोत.

देशातील वातावरण बदलत आहे. सरकार विरोधात वातावरण तयार होत आहे. याचा स्थानिक पातळीवर फायदा उचलला पाहिजे. त्यामुळे जनसंघर्ष यात्रा परिवर्तनाची नांदी झाली पाहिजे याची दक्षता घ्यावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पायात पाय अडकवल्याने काँग्रेसवर जनसंघर्ष करण्याची वेळ आल्याची कबुली देऊ न आता हातात हात घालून काम करावे लागेल, असे सांगितले.

उमेदवारांच्या घोषणा

हातकणंगले- शिरोळ तालुक्यात झालेल्या सभेवेळी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी दिलजमाई झाल्याचे वारंवार सांगितले. आमदार सतेज पाटील, जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी काँग्रेसमध्ये ऐक्य निर्माण झाल्याने निवडणुकीत यश मिळेल, असा दावा केला. याच वेळी राजू आवळे (हातकणंगले), प्रकाश आवाडे (इचलकरंजी) व  गणपतराव पाटील (शिरोळ) यांची विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून पक्षाच्यावतीने आज घोषणा करण्यात आली. तसेच त्यांच्या प्रचाराचा नारळ श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे फोडण्यात आला.

First Published on September 2, 2018 2:44 am

Web Title: big bang for opponents in the state with shetty ashok chavan
Next Stories
1 शेट्टींसह राज्यात विरोधकांची महाआघाडी – अशोक चव्हाण
2 काँग्रेसकडून सौम्य हिंदुत्वाला गवसणी
3 ‘जनसंघर्ष यात्रे’तून काँग्रेसचे बचावात्मक प्रचार अभियान
Just Now!
X