विधानसभा निकालानंतर भाजपपेक्षा कमी जागांवर विजय मिळूनही शिवसेनेचे वाढलेले महत्व लक्षात घेता आता अनेक अपक्ष आमदारांची पावलेही शिवसेनेच्या दिशेने पडू लागली आहेत. शिवसेनेकडूनही या अपक्षांना आपल्या गोटात घेत पक्षाचे संख्याबळ वाढवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून या अंतर्गतच कोल्हापुरातील निवडून आलेल्या प्रकाश आवाडे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर या दोन्ही आमदारांची काल रात्री शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्याबरोबर सविस्तर भेट झाली आहे. ही भेट वरवर जरी अभिनंदनासाठी असल्याचे सांगितले जात असले, तरी यामध्ये या पाठिंब्याबाबतच चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

विधानसभेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून महायुतीसाठी जनादेश मिळाल्याचे वरवर वाटत असले, तरी भाजप आणि शिवेसेनेचे संख्याबळ पाहता सत्तास्थापनेत शिवसेनेच्या भूमिकेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. सत्तेतील वाटा सेनेला अधिक मिळणार असल्याचे स्पष्ट होताच आता अनेक अपक्षांची पावलेही सेनेच्याच दिशेने पडू लागली आहेत. कोल्हापूर जिल्ह्य़ातून प्रकाश आवाडे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे दोन अपक्ष यंदा निवडून आले आहेत. यातील प्रकाश आवाडे  काँग्रेसचा राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले होते. प्रारंभी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत त्यांच्याकडून निवडणूक लढवण्यासाठीही प्रयत्न केले होते. मात्र युती झाली आणि हा मतदार संघ भाजपच्या वाटय़ाला आल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरावे लागले आहे. दरम्यान विजयी झाल्यावर आता शिवसेना आणि आवाडे यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला आहे.

आवाडे अपक्ष म्हणून निवडून आले असले, तरी त्यांना शिवसेनेची छुपी मदत झाल्याची चर्चा आहे. त्यातूनच आवाडे यांचाही कल शिवसेनेकडे असून पक्षाचेही त्यांना सोबत घेण्याचे धोरण आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच मंडलिक यांनी आवाडे यांची भेट घेतली. आपली ही भेट आवाडे यांच्या अभिनंदनासाठी असल्याचे त्यांनी सांगितले असले, तरी बंद खोलीत या दोन्ही नेत्यांमध्ये सेना प्रवेशासाठीच चर्चा झाल्याचे समजते. या भेटीनंतर आवाडे यांनीही मतदार संघाच्या विकासासाठी परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याचे सूतोवाच केले आहे.

यड्रावकरही संपर्कात

आवाडे भेटीनंतर मंडलिक यांनी जयसिंगपूर गाठले. त्यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊ न सत्कार केला. या दोघांमध्येही बंद खोलीत चर्चा झाल्याचे समजते. मंडलिक यांची ही भेटही शिवसेनेच्या संपर्क अभियानातील असल्याचेच बोलले जात आहे. दोन दशकांपूर्वी युतीच्या पहिल्या सत्तापर्वात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे वडील शामराव पाटील राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिवसेनेसोबत होते. या जुन्या नात्याची आठवण करून देत मंडलिक यांनी त्यांच्यासाठी पक्षप्रवेशाचा प्रस्ताव ठेवल्याचे समजते.