महाराष्ट्र बँकेचा पुढकार

कागल तालुक्यातील हाणबरवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे रोकडरहित व्यवहारांसाठी सज्ज असणारे गाव झाल्याची घोषणा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी, देशाच्या अर्थव्यस्थेतील बदल स्वीकारण्यासाठी हाणबरवाडीने उचलेले पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे या वेळी सांगितले. जिल्ह्यतील ३२ बँका एक एक गाव ‘डिजिटल पेंमेट’ प्रणालीमध्ये आणणार आहेत.

रोकडरहित  इंडिया आणि रोकडरहित महाराष्ट्र या शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत हाणबरवाडी या छोट्याशा गावाने सकारात्मकदृष्ट्या बदल स्वीकारून शासनाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या सेनापती कापशी शाखेने पुढकार घेतला होता. हाणबरवाडी येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. कुणाल खेमणार यांनी ही घोषणा केली. रोकडरहित महाराष्ट्रासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी प्रत्येक बँकेने जिल्ह्यातील किमान एकतरी गाव रोकडरहित  करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत जिल्ह्यतील ३२ बँकांनी एक एक गाव डिजिटल पेंमेट प्रणालीमध्ये आणण्यासाठी निवड केली.

हाणबरवाडी हे गाव डिजिटल पेंमेट प्रणालीमध्ये आणण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राने अहोरात्र मेहनत करून १५ दिवसांत हे गाव रोकडरहित  व्यवहारांसाठी प्रेरित केले. त्यासाठी १४०६ लोकसंख्येच्या ३२० घरांमधील युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थ यांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले. या गावात ८२३ बँक खाती आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रच्या सेनापती कापशी शाखेने केलेल्या या सर्व प्रयत्नांना गावानेही अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि कोल्हापूर जिल्ह्यात डिजिटल पेंमेट व्हिलेज होण्याचा मान मिळविला.

जिल्हा परिषदेचे सदस्य परशुराम तावरे, बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक संजय मणियार, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशिकांत किणींगे, प्रांत मनीषा कुंभार, गावकरी श्री. कसलकर, माजी सरपंच साळवी यांनी मनोगत व्यक्त केले.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांना गहू व तांदूळ यांचे वितरण करून डिजिटल पेमेंट प्रणालीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. संपूर्ण गाव रोकडरहित  व्यवहारांसाठी सज्ज केल्याबद्दल सेनापती कापशीचे शाखा व्यवस्थापक अर्जुन पोटजाळे, सरपंच मालुताई सुतार, बँक मित्र परशुराम कोले, महा ई सेवाचे रवींद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक बँक ऑफ महाराष्ट्रचे ए. आर. घाटे यांनी केले. आभार तहसीलदार किशोर घाटगे यांनी मानले.