दोन्ही काँग्रेसच्या आमदारांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत चंद्रकांत पाटील यांची टिप्पणी

कोल्हापूर : भाजपात प्रवेश करावा याकरिता आम्ही कोणाच्याही दारात जात नाही. ज्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता सतावते असे अनेक जण रात्री—अपरात्री भाजपात येण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत पक्षात घेण्याची विनंती करत आहेत, असे मत भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुR वारी कोल्हापुरात नोंदवले.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज पाटील प्रथमच कोल्हापुरात आले. या वेळी करवीर नगरीत भाजपच्या कार्यकर्त्यांंनी त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर त्यांनी राजकीय घडामोडी, भाजपात इतर पक्षांच्या आमदारांचे संभाव्य प्रवेश याविषयी पत्रकारांशी संवाद साधला.

भाजप प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे,असे सांगत पाटील म्हणाले, की यामध्ये एकटय़ा राष्ट्रवादीचेच १० ते १२ आमदार भाजपात येणार आहेत. काँग्रेसचेही अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचेही पाटील यांनी या वेळी सांगितले. पत्रकारांनी त्यांची नावे विचारल्यावर थोडे थांबा आणि पाहा असे पाटील यांनी सांगितले.

टोपी विश्वजितना बसली!

भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी असून यामध्ये नुकत्याच निवडलेल्या काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे विधान पाटील यांनी या पूर्वी केले होते. याविषयी ते म्हणाले, ‘मी टोपी फेकलेली आहे. ती कुणालाही बसणारी आहे. त्यातूनच आमदार विश्वजित कदम यांनी मी भाजपात जाणार नाही, असा खुलासा केला असावा,’ असा टोला लगावला.