दयानंद लिपारे

करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने साखर कारखान्यांना जंतुनाशक (सॅनिटायझर) निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले होते. त्यानुसार राज्यातील ८० साखर कारखान्यांनी मिळून तब्बल ४१ लाख लिटर जंतुनाशकाची निर्मिती केली. मात्र जंतुनाशक वापराबाबत सुरुवातीला असलेले गांभीर्य आता न राहिल्याने कारखान्यांकडील ही विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे आता शिल्लक असलेल्या दहा लाख लिटर जंतुनाशक साठय़ाची विक्री कशी करायची याची चिंता साखर उद्योगात पसरली आहे.

देशभरात मार्च महिन्यापासून करोना संसर्ग वाढीस लागला. केंद्र शासनाने साखर कारखान्यांना जंतुनाशक निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. बहुतांशी कारखान्यांकडे अल्कोहोल निर्मिती प्रकल्प आहेत. त्यातून स्पिरिटचे उत्पादन घेतले जाते. ८० टक्के अल्कोहोल व २० टक्के अन्य घटक यांचे मिश्रण करून कारखान्यांनी जंतुनाशकाचे (सॅनिटायझर) उत्पादन घेण्यास सुरुवात केली.

राज्यात ११०  कारखान्यांमध्ये अल्कोहोल निर्मिती प्रकल्प असले तरी ८० कारखान्यांनी यामध्ये सहभाग घेतला. त्यांच्या या नव्या उत्पादनाला प्रारंभी मागणीही चांगली राहिली.  त्यामुळे कारखान्यांना जंतुनाशक  उत्पादन घेण्यास जूनपर्यंत असलेली मुदत पुढे डिसेंबर महिन्यापर्यंत वाढवण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून जंतुनाशकाचा वापर मोठय़ा प्रमाणात कमी होऊ लागला. यातून उत्पादन केलेल्या या जंतुनाशक  साठय़ाचे करायचे काय याचा घोर कारखान्यांना लागला आहे.

राज्यात आतापर्यंत कारखान्यांनी ४१ लाख लिटर जंतुनाशकाची निर्मिती केली. पैकी ३० लाख लिटरची विक्री झाली. उर्वरित साठय़ातील दोन लाख ३८ हजार लिटर जंतुनाशकाचे  मोफत वाटपही करण्यात आले. पण तरीही आता उरलेल्या या १० लाख लिटर जंतुनाशकाचे करायचे काय, हा या कारखान्यांपुढे प्रश्न आहे.