कोल्हापूर, प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी स्थापन करण्यात येईल, असे शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. शाहूपुरी भागात एका संस्थेच्या कार्यक्रमाला राज्यमंत्री पाटील यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोल्हापूर महापालिकेसाठी नेमकी काय रणनिती असेल या मुद्द्यावर प्रकाश टाकला.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला मंत्री सतेज पाटील यांनी पूर्णविराम दिला. “कोल्हापूर शहरात काँग्रेस पक्षाची चांगली ताकत आहे. येथे पक्ष स्वबळावर लढणार आहे. निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सत्तेमध्ये येईल”, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागात गट-तट असल्याने तेथील निवडणुका स्थानिक परिस्थितीनुसार लढवल्या जातील, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील. ते आपापले गड राखतील. मात्र त्यात काँग्रेस पक्षच सरस ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांनी तिन्ही पक्षांना लगावला टोला

“जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे पक्ष वेगळे लढणार हे नाटक आहे. आधी वेगळं आणि नंतर एकमेकांना मदत करत एकत्र यायचं अशी त्यांची निती आहे. तिघे एकत्र आले तर उमेदवारी वाटपावरून भांडणे होतील, म्हणून ते वेगळे लढत आहेत. अशा गोष्टी न समजायला आम्ही किंवा कोल्हापूरची जनता मूर्ख नाही”, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना लगावला.