कोल्हापूर : जिल्ह्यतील करोनाचा रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिली. चांगले काम करीत असलेल्या ग्रामसमित्या व सरपंच यांचे अनुकरण इतर गावांनी करावे, ग्रामस्तरीय अलगीकरण कक्ष स्थापन करावेत, तसेच तपासण्या वाढवून बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळवून द्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करोना नियंत्रणासाठी  प्रमुखांची बैठक घेण्यात आली. देसाई म्हणाले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रतिजन चाचणीचे योग्य प्रमाणात वाटप करावे. किमान १५ दिवसांचा औषधांचा साठा प्रत्येक शासकीय कोविड केंद्रात असेल याप्रमाणे  नियोजन करावे, औषधे शासनाकडून मागविणे किंवा स्थानिकरीत्या खरेदी करणे याचे योग्य नियोजन करावे. पूर परिस्थितीमुळे बाधित भागातील ज्येष्ठ नागरिक व मदतकार्यात सहभागी नावाडी व बचाव पथकातील तरुण यांचे लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे.