शासनाच्या कारभाराविरोधात सातत्याने रस्त्यावर उतरणाऱ्या शिवसेनेने सोमवारी महाराष्ट्राचे महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांच्या स्वतंत्र विदर्भाच्या विधानावरून निदर्शने केली. इचलकरंजी येथे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करताना शिवसनिकांनी अणे यांचा निषेध नोंदवतानाच शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला.
अॅड. अणे यांनी एका व्याख्यानप्रसंगी स्वतंत्र विदर्भाची गरज असल्याचे मत नोंदविले होते. त्यांच्या विधानावरून सत्तेचा घटक असलेल्या शिवसेनेने आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. नागपूर अधिवेशन सुरू असताना सेनेच्या आमदारांनी निदर्शने केली. तसेच इचलकरंजी येथील मलाबादे चौकात अणे यांच्या वक्तव्याच्या विरोधात शिवसनिकांनी निदर्शने केली. कट्टर विदर्भवादी असणारे अणे यांचे स्वतंत्र विदर्भ संदर्भातील विधान बेताल आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्यासह अनेक समस्या उग्र रूप धारण करीत असताना त्या विरोधात अणे काहीही बोलत नाहीत. उलट राज्य तोडण्याची भाषा करून ते महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले असून त्यांचा अवमान अणे यांनी केला असून तो शिवसेना खपवून घेणार नाही, असे म्हणत जिल्हाप्रमुख जाधव यांनी अणे यांचा निषेध नोंदविला. या वेळी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, आण्णा बिल्लुरे यांची भाषणे झाली.
आंदोलनात महेश बोहरा, सयाजी चव्हाण, राजू आलासे, गोरख पुजारी, संजय पाटील, सचिन खोंद्रे यांच्यासह शिवसनिक सहभागी झाले होते.