सन २०१६-१७च्या अर्थसंकल्पामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात ५० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत. त्याचबरोबर १५ दिवसांत आयजीएम हॉस्पिटलचे शासनाकडे हस्तांतरण होणार असून, नगरपालिकेचे हे एकमात्र हॉस्पिटल असेल. शिवाय अमृतमधून वारणा योजनेला मंजुरी मिळणार असल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी शुक्रवारी पत्रकार बठकीत दिली.
दरम्यान, इचलकरंजीवासीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या रुकडी येथील पंचगंगा नदीवरील पुलासाठी ११ कोटी व त्यावरील रस्त्यासाठी ११ कोटी असा २२ कोटीचा निधी मंजूर झाला असून, गत ६० वर्षांत प्रथमच विविध योजनांच्या माध्यमातून इतकी मोठी रक्कम रस्त्यासाठी मिळाली असल्याचेही आमदार हाळवणकर यांनी सांगितले. खर्चीवाल्यांच्या मजुरीवाढसंदर्भात सर्वसमावेश बठक घेण्याची सूचना प्रांताधिकारी यांना देण्यात आली
पायाभूत सुविधा मिळाली, की गावाचा व परिसराचा विकास झपाटय़ाने होतो हे लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने ही कामे मंजूर झाली आहेत. केंद्रीय राखीव निधीतून (सीआरएफ) रुकडी पुलासाठी ११ कोटी आणि पुलावरील रस्त्यासाठी ११ कोटी, अर्थसंकल्पातून अतिग्रे-कबनूर-इचलकरंजी रस्ता सुधारणा करण्यासाठी ६५ लाख, नदीवेस नाका ते पंचगंगा पूल रस्त्याचे भराव टाकून रुंदीकरण करण्यासाठी ३ कोटी, इचलकरंजी-आयको मिल रस्ता सुधारणा करण्यासाठी ३५ लाख, कबनूर-यड्राव फाटा रस्ता सुधारण्यासाठी ६० लक्ष, कबनूर-रुई रस्ता सुधारण्यासाठी ४० लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर नगरविकास विभागमधून वैशिष्टय़पूर्ण योजनेंतर्गत इचलकरंजी शहरातील अंतर्गत रस्त्यासाठी ५ कोटीचा निधी मिळणार आहे.