महापालिका हद्दवाढ व्हावी आणि होऊ नये यासाठी आंदोलन सुरू असताना राजधानी मुंबईतही त्याचे पडसाद उमटले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिवेशनामध्ये विधान सभागृहाच्या पायऱ्यावर उपोषण सुरू केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढ समर्थनात असणारे लोकप्रतिनिधीसह ५ जण आणि हद्दवाढीस विरोध करणारे लोकप्रतिनिधीसह ५ जण यांच्यासह संबधित मंत्री आणि प्रशासन यांची आपल्या दालनामध्ये सोमवार, १ ऑगस्ट बठक घेणार असल्याचे सांगितले. तर विरोधासाठी आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक, आमदार सत्यजित पाटील यांनीही विधाभनभवनाच्या पायऱ्यांवर विरोधाचे फलक घेऊन आंदोलन केले .

संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उपोषण स्थळी भेट दिली. शहराच्या हद्दवाढीची मागणी करणारे आणि हद्दवाढीस विरोध करणारे सदस्य हे आपलेच असून अशा विरोधी आंदोलनामुळे विरोधी पक्षांना आयता मुद्दा मिळणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर यावर संयुक्तिक बठक घेऊन निर्णय घेऊ, उपोषण मागे घ्यावे असे आवाहन आमदारांना केले. या आवाहनास प्रतिसाद देत हद्दवाढीस विरोध करणाऱ्या तिन्ही आमदारांनी उपोषण मागे घेतले. आमदार क्षीरसागर यांनी, काल हद्दवाढीची अधिसूचना शासनाकडून काढण्यात आली होती, त्या अधिसूचनेला स्थगिती का दिली, असा प्रश्न विचारात शासन हद्दवाढीचा निर्णय देत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवाणार असल्याचे सांगत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. उपोषणास माजी उपमुख्यमंत्री, आमदार अजित पवार यांनी भेट दिली. पवार यांनी, हद्दवाढ होणे गरजेचे असल्याचे सांगत हद्दवाढीचे समर्थन केले. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त बठक घेण्याचे मान्य केल्याने विषयावर पडदा पडला.

हद्दवाढ समर्थकांचा आज कोल्हापूर बंद

दरम्यान, सायंकाळी महापालिकेत झालेल्या हद्दवाढ समर्थकांच्या बठकीत या मागणीसाठी उद्या गुरुवारी कोल्हापूर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बठकीवेळी हद्दवाढीस विरोध करणारे आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक यांचा निषेध नोंदवण्यात आला. तर, भाजपने हद्दवाढ समर्थनासाठी सुरू ठेवलेले बेमुदत धरणे आंदोलन आज तिसऱ्या दिवशी गुंडाळले.