News Flash

पुराच्या पाण्यात अडकलेली अडीचशे कुटुंबे सुरक्षित स्थळी

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक पुराच्या पाण्यात घुसून बचावाचे धाडसी काम करीत आहे.

एनडीआरएफच्या जवानांकडून सुरु असेलेले बचावकार्य. 

गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या २८० हून अधिक कुटुंबांतील जवळपास १ हजार ४०० लोकांना प्रशासन आणि एनडीआरएफ जवानांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक पुराच्या पाण्यात घुसून बचावाचे धाडसी काम करीत आहे.

यामध्ये प्रयाग चिखली येथील १५ कुटुंबातील ४८ व्यक्ती, वळीवडे येथील २५ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी आणि कवठेसार येथील ६५ कुटुंबातील सुमारे २११ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी आणि घुणकी येथील १२६ कुटुंबातील ६५० व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. भुदरगड तालुक्यातील शेणगांव येथील ६ कुटुंबातील २४ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. पन्हाळा तालुक्यातील मराठवाडी येथील दरड कोसळण्याची शक्यता असल्याने १५ लोकांना केकतवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले.

शहरात बचावकार्य

महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत चार विभागीय कार्यालयामध्ये दक्षता पथके २४ तास कार्यरत ठेवण्यात आलेली आहेत. यामध्ये जवळपास एक हजार कर्मचारी तनात ठेवण्यात आले आहेत. पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ४५ फूट ६ इंच गेली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागामध्ये पुराचे पाणी गेल्याने तेथील १०७ कुटुंबातील ४६३ लोकांना महापालिका प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. यापुढेही पुराचा धोका असणाऱ्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम प्रशासनाने गतिमान केले आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक जिल्ह्यात रात्रीच दाखल झाले असून ४२ जवानांच्या या पथकाचे प्रमुख डेप्युटी कमांडंट अलोककुमार हे आहेत. यांच्या नेतृत्वाखाली या पथकाचे दोन गट तयार करण्यात आले असून शोध, बचाव व मदत कार्यासाठी ही पथके कार्यरत आहेत. रात्री कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर केर्लीजवळ दोन ट्रक पाण्यात गेले. त्यातील चार जणांना या पथकाने सुरक्षितरित्या बाहेर काढले. तसेच पाण्यात गेलेली इन्होवा कारही या पथकाने बाहेर काढली. याबरोबरच सकाळी आंबेवाडी येथील वडणगे रोडवरील शिवपार्वती यात्री निवासातील ८ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. आंबेवाडी येथे पाण्यात गेलेल्या दोन लहान मुलांना या पथकाने सुरक्षितरीत्या बाहेर काढले. एक जण बेपत्ता असून त्याचा शोध पथकामार्फत सुरु आहे. तर पुलाची शिरोली येथील गवत कापण्यासाठी गेलेले दोन जण पुराच्या पाण्यात अडकल्याने झाडावर थांबले होते. त्याही दोन जणांना या पथकाने सुरक्षितरीत्या हलविले. या पथकातील जवानांबरोबरच जीवनज्योत सेवा संस्थेच्या १० कार्यकर्त्यांंनी सहभाग घेतला.

सुतारमळा, शाहूपुरी कुंभार गल्ली, जामदार क्लब या परिसरात पुराचे पाणी आलेने तेथील एकूण १०७ कुटुंबातील ४६३ नागरिकांना दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ व मुस्लीम बोंर्डीग येथे, तर शाहूपुरी व्यापार पेठ येथील महालक्ष्मी विद्यालयात स्थलांतरित करण्यात आलेले आहे. तर जामदार क्लब परिसरातील नागरिकांना ग.गो.जाधव शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच पाण्याची पातळी सतत वाढत असलेने उर्वरित नागरिकांनाही स्थलांतरित करणेची कारवाई सुरु आहे. महापालिकेच्या परिवहन विभागाकडून नागरिकांना स्थलांतरित करणेसाठी एक केएमटी बस उपलब्ध करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून परिसरात साफसफाई व औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच वैद्यकीय पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त विजय खोराटे, ज्ञानेश्वर ढेरे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता एस.के.माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी आज सकाळी स्थलांतरित केलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधांचा आढावा घेतला.आपत्कालीन स्थितीच्या मुकाबल्यासाठी महापालिकेच्या इमारतीमधील अग्निशमन विभागाकडे मुख्य आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १०१ असा आहे.  तसेच आरोग्य विभागाच्या आपत्ती काळातील तक्रारी संदर्भात दूरध्वनी क्रमांक २५४०२९० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 2:12 am

Web Title: flood alert declared in kolhapur due to heavy rains
Next Stories
1 पंचगंगा धोक्याच्या पातळीवर, इचलकरंजीत भिंत कोसळून एक ठार
2 महावितरणकडून भरपावसात २४ वीजेचे खांब पूर्ववत
3 समीर गायकवाडवरील सुनावणी लांबणीवर
Just Now!
X