भोगावती सहकारी साखर कारखान्यावर प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी प्रशासक नियुक्ती केली. भोगावतीच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच कारखान्यावर प्रशासक नियुक्ती झाली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला बिद्री कारखान्यापाठोपाठ भोगावतीत मोठा हादरा बसला आहे. त्याचबरोबर जम्बो नोकर भरतीचे भवितव्य टांगणीला लागले आहे. आता निवडणुकीची तारीख कधी जाहीर होणार याकडे अनेक इच्छुकांनी डोळे लावले आहेत. तर होणारी आगामी निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन लढवणार अशी चर्चा जोर धरत आहे.
शहर उपनिबंधक संभाजी निकम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीत शिरोळचे सहायक निबंधक सुनील धायगुडे आणि लेखापरीक्षक बी. एम. वाघ यांचा समावेश आहे. तर प्रशासक नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या दोन तासांतच प्रशासकीय मंडळाने कार्यकारी संचालक एस. एस. पाटील यांच्याकडून कारभाराची सूत्रेदेखील हाती घेतली.
भोगावतीची निवडणूक २०१० मध्ये झाली, यात काँग्रेसची सत्ता जाऊन राष्ट्रवादी-शेकाप सत्तेवर आले. सत्ताधाऱ्यांनी आपल्या काळात केलेली जम्बो नोकर भरती, पगारवाढ, वाढीव सभासद तसेच बेकायदेशीररीत्या केलेल्या बढत्या या कायम वादाच्या भोवऱ्यात राहिल्या. प्रशासक नियुक्तीमुळे या सर्व प्रकरणांची चौकशी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारखान्याच्या कारभारात मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे, त्याची सखोल चौकशी करण्याची विरोधी बाजूकडून होणारी वारंवार मागणी याबरोबरच कारखान्याच्या वाढीव सभासदां बाबतचा रखडलेला अहवाल यामुळे जवळपास दीड महिन्यापासून उच्च न्यायालयात होता. विद्यमान उपाध्यक्ष केरबा भाऊ पाटील यांचे बंधू हरि भाऊ पाटील, रामचंद्र गुंजेकर यांनीही भोगावतीवर प्रशासक नेमावा अशी मागणी केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2016 रोजी प्रकाशित
‘भोगावती’च्या इतिहासात पहिल्यांदाच कारखान्यावर प्रशासक नियुक्ती
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 25-03-2016 at 03:00 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For the first time administrators appointed on bhogavati sugar factory