एफ.आर.पी. प्रश्नी १ मे पासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. एकाही मंत्र्यास झेंडा वंदन करू दिले जाणार नाही. उद्धव ठाकरे १ मे रोजी कोल्हापुरात येणार असल्याने शिवसेनेने हा प्रश्न सोडवून आंदोलनाची वेळ आणू नये, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यात येथे पत्रकार परिषदेत दिला.
कायदा शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याने उसाची एफ.आर.पी.देण्याची जबाबदारी साखर कारखानदार व शासनाची आहे, असे नमूद करून शेट्टी म्हणाले,की शेतकऱ्यांचे पसे बुडवणाऱ्यांवर आणि बँकांवर कारवाई झाली पाहिजे. पांढऱ्या साखरेतील काळे धन शोधून काढण्याची मागणी त्यांनी केली. राज्यात भीषण दुष्काळ असल्याने दारू कारखाने बंद करण्याची मागणी त्यांनी केली.
साखर कारखाना विक्री घोटाळा
साखर तत्त्वावरील ३५ कारखाने अवघ्या १०७६ कोटी रुपयांना विकले असून या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत . तसेच, नवी दिल्लीतील ईडी च्याही कार्यालयात कागदपत्रांसह जाऊन करणार आहोत, असे सांगून शेट्टी म्हणाले,की हा सर्व व्यवहार संशय निर्माण करणारा आहे. यामध्ये १० हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. कारखान्याची विक्री करण्यापूर्वी करण्यात आलेले मूल्यांकन चुकीचे होते. एक कारखाना ३०० कोटी रुपयांना विकला जायला हवा होता.  हे कारखाने विकत घेणारे साखर कारखानदारांचे बगलबच्चे आहेत.