पालकमंत्र्यांचा लोकशाही दिनात दिलासा

कोल्हापूर : ‘ काका, तुमचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल, तुम्ही निर्धास्तपणे जा’, असा दिलासा पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी लोकशाही दिनात जनतेला दिला. पालकमंत्र्यांच्या या दिलाशामुळे अर्जकर्त्यांमध्ये समाधान दिसून आले.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी सहभागी होतात. कोल्हापूर जिल्ह्यातील या उपक्रमात सहभागी होण्याचा निर्णय तिन्ही मंत्र्यांनी घेतला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या लोकशाही दिन कार्यक्रमात पालकमंत्री पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व सांस्कृतिक राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर सहभागी झाले होते. आज दुसरा उपक्रम असताना पालकमंत्री वगळता अन्य दोन मंत्री अधिवेशनामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सारी मदार गृह राज्यमंत्र्यांवर होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या लोकशाही दिनातून प्रश्न सोडवून घेण्याच्या उद्देशाने नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याबरोबर त्यांच्या निराकरणासंबंधीचे निर्देशही मंत्री पाटील यांनी संबंधित यंत्रणांना दिले. नागरिकांच्या प्रश्न आणि समस्यांबाबत निवेदने पालकमंत्र्यांनी स्वीकारली. सुमारे ६१५ अर्ज,निवेदने दाखल झाली.

कित्येक प्रश्न प्रलंबित

गेल्या दहा पंधरावर्षांपासून प्रलंबित असलेले कित्येक प्रश्न या लोकशाही दिनात अनेकजणांनी मांडले. अशा प्रलंबित प्रश्नांचा अधिकाऱ्यांनी योग्य मार्ग काढून सोडवणूक करावी. आज एका तलाठय़ाच्या कामाविषयी गंभीरता निदर्शनास आल्यावर संबंधित तलाठय़ावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शिक्षण विभाग आणि सीपीआर हॉस्पिटलकडील वैद्यकीय बिलांबाबत तक्रारी आल्याने या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती उपाययोजना करून प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले.