अचानक वाढलेल्या उकाडय़ाने हैराण झालेल्या कोल्हापूर, सांगलीतील जनतेला आज पडलेल्या अवकाळी पावसाच्या जोरदार सरींनी दिलासा मिलाला. या दोन्हीही जिल्ह्य़ात आज सायंकाळी गारांसह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दरम्यान सातारा जिल्ह्य़ातील कराड परिसरातही पावसाच्या काही सरी कोसळल्या.

या महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली होती. फाल्गुन सुरु झाल्यावर तर सर्वाना घामेघूम व्हायला झाले होते. होळीची आग विझवायला पाऊ स धावून येतो, असा एक मतप्रवाह आहे. होळी -धुळवड संपली तरी पावसाने दर्शन दिले नव्हते. मात्र आज रंगपंचमीचा रंग धुवून काढण्यासाठी पाऊ स आला.

कोल्हापूर जिल्ह्यत पावसाची तुरळक प्रमाणात हजेरी  लावली जाईल, असा अंदाज हवामान खात्याचा होता. त्याप्रमाणे सकाळपासून वातावरण होते. सकाळपासूनच प्रखर  सूर्यप्रकाश होता आणि  उष्माही  वाढत गेला. दुपारनंतर आकाश काळवंडून आले. जिल्ह्यत अनेक ठिकाणी जोरदार पाऊ स कोसळला. कोल्हापूर शहरात सायंकाळी आकाश गच्च झाले, पावसाबरोबरच गारा पडू लागल्या. पहिल्या पावसात गारा  गोळा करण्याचा आनंद बालगोपाळांनी लुटला.

कोल्हापुरातील तापमान ३९ अंश सेल्सिअस पर्यंत होते. उद्या मंगळवारी त्यामध्ये काहीशी घसरण होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्य़ातदेखील दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. गेले चार दिवस दिवसाच्या कमाल तपमानात वाढ होत असून आज दुपारी तापमान ३८ अंशापर्यंत पोचले होते. मात्र ढगाळ हवामान आणि हवेतील आद्र्रता यामुळे तापमान याहून जास्त असल्यासारखे जाणवत होते. आज दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी झाली. सायंकाळी सांगली, मिरजेसह जिल्हयाच्या काही भागात हलका पाऊस झाला. ढगांचा गडगडाट सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता.

सध्या जिल्हयातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असून काही बागा काढणीच्या टप्प्यात आहेत. या पावसाने या बागांना धोका नसला तरी शेडवर वाळवणीसाठी टाकलेल्या बेदाण्यावर परिणाम होण्याची भीती आहे.

दरवर्षी होळी पौर्णिमेनंतर असलेल्या धूलिवंदनाला पाऊस होत असल्याचे सांगितले जाते. यामुळे हा पाऊस अनपेक्षित मानला जात  नसला तरी द्राक्ष बागायतदार मात्र चिंतेत आहेत. दरम्यान सातारा जिल्ह्य़ातील कराड परिसरातही आज संध्याकाळी पावसाच्या काही सरी कोसळल्या.