बांधकाम व्यवसायात आलेल्या दारुण आíथक अपयशातून वाचविण्यासाठी स्वत: मृत झाल्याचा बहाणा करून अन्य व्यक्तीला वाहनामध्ये जिवे पेटवून देण्याचा प्रकार गुरुवारी येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने उघडकीस आणला. अमोल जयवंत पवार व त्याचा भाऊ विनायक जयवंत पवार (रा. अपराध कॉलनी, साने गुरुजी वसाहत) या दोघांना पोलिसांनी तरुणाचा खून व अन्य गुन्ह्याप्रकरणी अटक केली. या प्रकारे ३५ कोटी रुपये हडप करण्याचा त्याचा प्रयत्न होता, असे पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
आजरा ते आंबोली या रस्त्यावर लक्ष्मी पुलाखालील ओढय़ामध्ये चारचाकी गाडीचा अपघात २९ फेब्रुवारी रोजी घडला होता. त्यामध्ये वाहन पूर्णत: जळाले होते. त्यात वाहनचालकाची हाडे व कवटी शिल्लक राहिली होती. गाडीच्या चासी व इंजिन नंबरच्या आधारे ही गाडी अमोल पवार यांची असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र गाडीतील व्यक्ती जळाल्याने तिची ओळख पटत नव्हती. मयत व्यक्तीचा मृतदेह अमोल पवारचा की अन्य कोणाचा, तो अपघात आहे की घातपात हे सांगणे कठीण होते. त्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर पाटील, सहायक पोलिस निरीक्षक रिवद्र कदम व तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक निरधे यांनी घातपाताच्या दृष्टीने शास्त्रशुध्द तपासास सुरुवात केली. गुन्हा क्लिष्ट स्वरुपाचा असल्याने पोलिसांसमोर आव्हान होते. अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक पवार यांनी त्यांच्या बांधकाम व्यवसायासाठी वेगवेगळ्या बँका व पतसंस्था, तसेच खाजगी सावकार यांच्याकडून मोठय़ा रकमेचे कर्ज उचल केले होते. अमोल याने नुकतीच मोठी विमा पॉलिसी काढल्याचे निदर्शनास आले होते. गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना अमोल पवार हा बेंगलोर, चेन्नई, कोची या भागात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव, रमेश खुणे व पाच पोलिसांचे पथकाने अमोल पवार याला गाठले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
गडिहग्जल येथून खुदाई कामासाठी रमेश नाईक या १९ वर्षीय तरुणास १७०० रुपये एका दिवसासाठी पगार देण्याचे आमिष दाखवून त्याला घराबाहेर काढले.अमोल याने त्याला गाडीतून नेऊन उत्तुर (ता. आजरा) येथे आणले. तेथे अमोलचा भाऊ विनायक हा भेटला. दोघांनी रमेशला गाडीतून पुढे रस्त्याकडेला आतील बाजूस नेले. निर्जनस्थळी रमेश नाईक याचा दोरीने गळा आवळून खून केला. रमेश नाईक याचे कपडे बदलून अमोलचे कपडे व घडय़ाळ घातले. त्यानंतर मृत नाईक यास घेऊन दोन्ही आरोपी घटनास्थळी गेले. तेथे गाडीसह मृत नाईक यास ओढय़ाच्या खड्डय़ात ढकलून दिले. खाली जाऊन गाडीवर डिझेल ओतून पेटवून दिले. गाडी व नाईक याचे प्रेत जळून खाक झाल्याची खात्री झाल्यानंतर दोघे पळून गेले. अमोल हा बेळगाव, बेंगलोर, चेन्नई, पाँडेचरी, कोची या भागात राहिला.