कोल्हापूर शहराची हद्दवाढ प्रस्तावित १८ गावांसह करण्याचा निर्णय येत्या चार दिवसात न घेतल्यास सोमवार (२२ऑगस्ट) पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने रविवारी दिला. या मागणीसाठी आज महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले असता ही घोषणा करण्यात आली. सोमवारच्या उपोषणामध्ये महिलांसह, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी नव्याने आंदोलन तापले आहे. सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या वतीने महापालिकेजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान आंदोलनस्थळी आमदार राजेश क्षीरसागर यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून हद्दवाढ कृती समिती व हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या शिष्ठमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पुन्हा बठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले.  आंदोलनावेळी आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक आहे. मात्र काही लोकांच्या चुकीच्या धोरणामुळे हद्दवाढीची अधिसूचना निघण्यास उशीर लागत आहे. हद्दवाढीसाठी विधिमंडळाच्या दारातील उपोषण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शब्दाखातर आपण मागे घेतले आहे. चंद्रकांतदादांनी फोनवरून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बठक घेऊन शहराच्या दृष्टीने चांगला निर्णय घेऊ असे सांगितले आहे. हद्दवाढीची अधिसूचना तत्काळ न काढल्यास हिवाळी अधिवेशनामध्ये पुन्हा उपोषणास बसणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी हद्दवाढीसाठी आपण आमरण उपोषणास बसणार असल्याचे जाहीर केले.  माजी महापौर अ‍ॅड. महादेव आडगुळे म्हणाले, हद्दवाढीबाबत पालकमंत्री सकारात्मक आहेत. मात्र त्यांनी संभ्रमावस्था सोडावी आणि शासनाच्या निकषावर हद्दवाढ करावी अशी मागणी केली.