राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचे कृतिशील अनुकरण केले. उक्ती आणि कृतीची जोड असेल तर त्या कार्याला महत्त्व प्राप्त होते, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने अण्णा हजारे यांना ‘राजर्षी शाहू पूरस्कार’ श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते गुरुवारी रात्री प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. सन्मान चिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठविलेल्या संदेशाचे वाचन सूत्रसंचालक पंडित कंदले यांनी केले.

राजर्षी शाहूंचे विचार कृतिशीलतेने पुढे नेले पाहिजेत, असा उल्लेख करून हजारे यांनी आपल्या जीवनात ते कसे कृतीत आणले याचे दाखले दिले. ते म्हणाले, गावात दलितांना मंदिर प्रवेश करू दिला. त्यांच्यासमवेत सामुदायिक भोजन सुरू केले. पोळा सण बैलांचा, पण कोणाचा बैल पुढे यावरून पाटलांत हाणामारी व्हायची. शाहू महाराजांनी  दलितांचा बैल पुढे ठेवण्याचा नवा पायंडा पाडला, तो आजही  सुरू आहे. समाजातील जातीय विषमता दूर करण्यासाठी राजर्षी शाहूंनी आपले आयुष्य घालवले.

श्रीमंत शाहू छत्रपती पुढे म्हणाले, की उपोषण आणि सत्याग्रह करून सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून अण्णांनी जनहिताचे काम साध्य केले आहे. लोकपाल नियुक्तीमध्ये अण्णांचा सिंहाचा वाटा आहे. समारंभाचे अध्यक्ष शिवाजी विद्यपीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, राजर्षीच्या शिक्षणाचा वसा स्वीकारून अण्णांनी लोकशिक्षणाचे स्वरूप दिले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अशोक चौसाळकर यांनी गौरवमूर्तीचा परिचय करून दिला. ट्रस्टच्या सचिव डॉ. राणी ताटे यांनी मानपत्राचे वाचन केले. ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे यांनी सर्वाचे आभार मानले. महापौर सरिता मोरे, महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, डॉ. जयसिंगराव पवार, ट्रस्टच्या सचिव डॉ. राणी ताटे उपस्थित होते.