‘फेसबुक’, ‘व्हॉट्स अॅप’सारख्या समाजमाध्यमांमुळे संगणकीय गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. अशा गुन्ह्यांमुळे तरुणांचे संपूर्ण करीयर बरबाद होते. त्यामुळे तरुणाईने आपल्या सुविधेसाठी असलेल्या या संवाद साधनांचा दुरुपयोग करू नये. जीवनात यशस्वी होण्यासाठी अधिकाधिक कष्ट करणे गरजेचे असून आठ तासांऐवजी १८ तास अभ्यास व मेहनत करा, असा मंत्र पोलीस उपअधीक्षक रावसाहेब सरदेसाई यांनी आज दिला.
वालचंद महाविद्यालयात सुरू असलेल्या व्हिजन २०१६ या तंत्रज्ञानविषयक राष्ट्रीय स्पर्धा प्रदर्शनाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर होत्या. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. जी. व्ही. पारिषवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजीर जाधव, विद्यार्थी कल्याण मंडळाचे डॉ. बी. जी. पाटील, समन्वयक अभिषेक ओसरडे, विद्यार्थी प्रतिनिधी सुनंदा रुपनर आणि सिद्धार्थ गोटमुकळे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी संप्रदा बीडकर यांनी व्हिजन २०१६ हा उपक्रम प्रेरणा देणारा, नव्या विचारांना चालना देणारा असल्याचे मत व्यक्त केले. अंजीर जाधव यांनी पोलीस विभागात येणारे अनुभव सांगून विद्यार्थ्यांना गुन्हे व त्याचे होणारे परिणाम यांची जाणीव करून दिली.
दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात देश विदेशातील ७० हून अधिक महाविद्यालयांतील चार हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. स्मार्ट सिटी, रोबो रेसिंग या प्रकल्पासह शालेय विद्यार्थ्यांनी हॉवर क्राफ्ट, पाणी अडवा, पाणी जिरवा, टाकाऊपासून टिकाऊ, सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती असे प्रकल्प सादर केले.
यावेळी इस्पोटेक, रोबोटेक, जनरल, सायबर माईंड आणि टेक्नेझेन अशा पाच विभागांतर्गत घेण्यात आलेल्या २० प्रकारच्या स्पर्धाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सिंहगड इन्स्टिटय़ूट ऑफ पुणेच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पारितोषिके मिळवल्याने, इन्स्टिटय़ूटला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. या कार्यक्रमास देशभरातून आलेले विद्यार्थी व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वालचंद महाविद्यालयातर्फे आयोजित व्हिजन २०१६ या तंत्रज्ञानविषयक स्पर्धा प्रदर्शनात सांगली पोलीस विभागाच्या दालनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यासाठी पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजीर जाधव व त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली. नागरिक व विद्यार्थ्यांशी संवाद व्हावा तसेच पोलीस विभागाची माहिती व्हावी, या उद्देशाने पोलीस विभागाने या प्रदर्शनात सहभाग घेतला.
या दालनात सायबर क्राईम, मोबाईल क्राईम, संगणकाचा वापर करून केलेले गुन्हे, बाँब शोधक व नाशक पथके, पोलीस वापरत असलेली हत्यारे, आíथक गुन्हे, अंगुलीमुद्रा, दहशतवादविरोधी पथक आणि श्वान पथकाबाबत माहिती प्रदíशत करण्यात आली. तसेच, पोलीस विभागामार्फत दामिनी पथक, महिला सुरक्षा प्रतिसाद अॅप, वाहतूक नियम, आíथक गुन्हे आदींबाबतचे १४ लघुपट दाखवून जनजागृती करण्यात आली. या दालनास पाच हजार विद्यार्थी व पालकांनी भेट देऊन माहिती घेतली.