असहिष्णू तत्त्वे जगात सर्वत्र आढळतात. आपल्याकडेही कधीकधी डोके वर काढतात. या तत्त्वांना भारतीय संस्कृतीत स्थान नाही. सहिष्णुता हे सुसंस्कृतपणाचे आद्य लक्षण आहे, असे मत भारताचे अमेरिकेन दूतावासातील महावाणिज्य दूत आणि साहित्यिक ज्ञानेश्वर मुळे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने येथे शनिवारपासून २७ वे साहित्यसंमेलन सुरू झाले. दोन दिवस चालणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ िहदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या हस्ते राजाराम कॉलेज येथे झाले.
या वेळी संमेलनाध्यक्षपदावरून मुळे बोलत होते. साहित्याचे प्रयोजन, लेखन, स्वातंत्र्य, साहित्यिकांची बांधीलकी, कोल्हापुरातील साहित्यिक वातावरण आदी मुद्यांचा परामर्श मुळे यांनी घेतला. साहित्य प्रयोजन काय असावे, हे प्रत्येकाने ठरवावे, असे नमूद करून मुळे म्हणाले, लेखनस्वातंत्र्य अमर्याद असले तरी ते अर्निबध असू नये. त्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि संविधानिक चौकट असते, याचे भान असावे. वाचकाला ही संविधानिक मार्गानी टीका करण्याचा किंवा निषेध करण्याचा अधिकार आहे.
पुरस्कार वापसीच्या निर्णयामुळे आपल्यावर खूप टीका करण्यात आल्याकडे लक्ष वेधून अशोक वाजपेयी म्हणाले, राजकारणाने धर्म, साहित्य, शिक्षण अशा सर्व क्षेत्रांत घुसखोरी केली आहे. मग साहित्याने राजकारणात घुसखोरी केल्याने काय बिघडले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. साहित्य, साहित्यिकांना चुप्पी न साधता आवाज नसणाऱ्यांचा आवाज होण्यास शिकले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी साहित्य सभेच्या वाटचालीचा आढावा घेतला. देशातील सत्तेला हादरा कसा देता येतो, हे एरव्ही निरुपद्रवी वाटणाऱ्या साहित्यिकांनी दाखवून दिले. लेखकांची ताकद काय असते हे गेल्या वर्षी दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. खासदार धनंजय महाडिक, डॉ. रमेश जाधव, डॉ. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शाहूंच्या विचारप्रसारासाठी योगदान देणारे प्रा. एन. डी. पाटील, बाबुराव घारवाडे, डॉ. जाधव, डॉ. जगन्नाथ पाटील यांचा सत्कार करण्यात आला.