राज्य शासनाने पिण्याच्या आणि शेतीच्या पाणी पुरवठ्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले असून राज्यातील अपूर्ण धरणे, सिंचनप्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राकडून १४ हजार कोटी रुपयांना मंजुरी मिळाल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. या निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील अपूर्ण असलेले ८ सिंचन प्रकल्पही मार्गी लावले जातील, असेही पाटील यांनी सांगितले.

गडिहग्लज तालुक्यातील करंबळी येथे ३० लाख रुपये खर्चून उभारलेल्या ग्रामविकास भवनचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश हाळवणकर, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष िहदुराव शेळके, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रा.संजय मंडलिक, गोकूळचे संचालक बाबा देसाई, माजी आमदार संजय घाटगे  उपस्थित होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी विकासअण्णा पाटील हे होते. या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते ५६ लाख रुपये खर्चून उभारलेल्या राष्ट्रीय पेयजल योजना आणि स्ट्रिट लाइट प्रकल्पाचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला.

राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत ६ हजार ५०० गावांत १ लाख कामे हाती घेण्यात आली असल्याचे सांगून पाटील म्हणाले, आगामी काळात या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील ३३ हजार गावांमध्ये जलसंवर्धनाची कामे हाती घेऊन टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्याचा शासनाचा संकल्प आहे.

प्रारंभी सरपंच मालुताई इंगळे यांनी स्वागत केले. प्रा. तानाजी चौगुले यांनी प्रश्नांचा आढावा घेतला. या प्रसंगी समारंभाचे अध्यक्ष विकास पाटील अलोक पाटील, मारुतराव राक्षे यांनी मनोगत व्यक्त केले.