कोल्हापूर

इचलकरंजी व कोल्हापूर शहरात तसेच ग्रामीण भागातही करोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढू लागल्याने सोमवारपासून पुन्हा टाळेबंदीचा दुसरा टप्पा घोषित केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने होणारी वाढ आणि मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र याबाबत जिल्ह्यातील मंत्री, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींमध्ये मतभिन्नता असल्याचे शुक्रवारी दिसून आल्याने सकाळी झालेला ठोस निर्णय झाला नाही. अखेर सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार पासून सात दिवसाची टाळेबंदी जाहीर करण्यात आली. या कालावधीत दूध आणि औषध दुकाने सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची संख्या दोन हजाराकडे जाताना दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसात करोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जिल्ह्यात सध्या ६६५ करोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. हा वाढता संसर्ग पाहून टाळेबंदी करण्याची मागणी लोकप्रतिनिधी करत आहेत. तर, दुसर्‍या एका मतप्रवाहानुसार साडेसहाशे रुग्णांसाठी जिल्ह्यातील ४० लाख लोकांना टाळेबंदीच्या बेडीत अडकवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकप्रतिनिधींमध्ये मतभिन्नता

टाळेबंदी नको अशी भूमिका पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली आहे. टाळेबंदी योग्यच असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आहे. तर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण त्यांनी करोनाबाबत पुढील उपाय योजनांची आढावा बैठक घेतली. बैठकीच्या सुरुवातीला मंत्री मुश्रीफ यांनी अन्य दोन मंत्र्यांशी चर्चा करून बैठक निर्णय घेण्यात येईल असे सांगून पुढील बैठकीसाठी ते निघून गेले. यानंतर अन्य लोकप्रतिनिधींची मते आजमावून घेण्यात आली.

खासदार धैर्यशील माने, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आदींनी ८ ते १० दिवस कडक टाळेबंदी जाहीर करण्याची मागणी केली. खासदार संभाजीराजे, आमदार प्रकाश आवडे यांनी टाळेबंदीचा यापूर्वीचा अनुभव पाहता करोना संसर्ग पसरण्यास मर्यादित यश आले आहे. जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे. बेजबाबदारपणा टाळला पाहिजे, असे सांगत टाळेबंदी हा एकमेव उपाय असल्याचे स्पष्ट केले. आमदार जाधव यांनी टाळेबंदी करताना उद्योजकांना सवलत देण्याची मागणी केली. आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजू आवळे तसेच काही नगराध्यक्ष यांनी टाळेबंदी बाबत थेट भाष्य टाळले.