दयानंद लिपारे

केवळ मे महिन्यात ५० हजार रुग्णांची भर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यतील करोना संसर्ग वाढत चालला असून आता बाधित रुग्ण संख्या एक लाखावर पोहोचली आहे. यातील ५० हजार रुग्णांची केवळ मे महिन्यात भर पडली. वाढत्या रुग्णांपाठोपाठ मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गंभीर होत चाललेली करोना स्थिती हाताळणे हे शासन-प्रशासनासमोर आव्हान बनले आहे.

राज्यात गतवर्षी करोनाचा संसर्ग वाढू लागला, तेव्हा कोल्हापूर जिल्हा यापासून बराच मागे होता. तेव्हा २६ मार्च रोजी पुण्याहून आलेला भाऊबहिणींना करोनाची लागण झाल्याचे सर्वप्रथम आढळले. १८ एप्रिल रोजी ते बरी होऊन घरी पोहोचले तेव्हा सर्वांनाच आनंद झाला. त्यानंतर २५ एप्रिल रोजी रत्नागिरीहून आंध्र प्रदेशकडे प्रवास करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला संसर्ग झाल्याचे आढळले.

रुग्ण हजाराच्या आत

३० एप्रिल रोजी इचलकरंजीतील ६० वर्षीय वृद्धाचा पहिला बळी गेला. ३१ मे रोजी जिल्ह्यत २८ सकारात्मक रुग्ण आढळले तर एकूण रुग्णसंख्या ४५० झाली होती. या वेळेपर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर १५ जून रोजी एकही रुग्ण आढळला नव्हता. याच महिन्यात रुग्ण संख्या वाढू लागली. २३ जून रोजी १३१ रुग्ण आढळले. तेव्हा जिल्ह्यत एकूण ८६८ रुग्णांना बाधा झाली होती. त्यापैकी ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. ऑगस्ट महिना अखेर रुग्णसंख्या हजाराच्या आत होती. २५ ऑगस्ट रोजी ७७ सकारात्मक रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या ८७०, बरे झालेले रुग्ण संख्या ७१३ होती.

मे मध्ये कहर

या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली. सुरुवातीला ही रुग्णसंख्या कमी होती. १४ फेब्रुवारी रोजी १४ सकारात्मक रुग्ण आढळले. तेव्हा रुग्णसंख्येने अर्धा लाखाचा आकडा ओलांडला होता. त्यापैकी ४८ हजार २२४ रुग्ण बरे झाले होते. १७२९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मे महिन्यामध्ये दररोज हजारावर रुग्ण दाखल होऊ लागल्याने चिंता वाढीस लागली. या एकाच महिन्यात जवळपास ५० हजार रुग्णांची भर पडली. १ मे रोजी एकूण करोनाबाधितांची संख्या ५० हजार ४७७ होती. ती ७ मे रोजी ७६ हजारांवर पोहोचली. २४ मे रोजी ही संख्या ९९ हजार १९८ झाली. बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ८२ हजार २८६ होती. मृत्यूची संख्या ३३९१ होती. सध्या जिल्ह्यत १३ हजार ५२१ रुग्ण उपचार करत आहेत. जिल्ह्यत तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी होत असताना दुसरी लाट थोपवणे हेच खरे आव्हान आहे.