कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेला निकृष्ट दर्जाचे क्रीडा साहित्य पुरवून सोळा लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात दोघांवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘सनराईज इव्हेंट अँड एक्झीबिशन’ या फर्मचे प्रमुख अलोक यादव आणि योग्य गुणवत्तेप्रमाणे साहित्य नसतानाही पुरविलेले साहित्य योग्य असल्याबाबतचा चुकीचा अहवाल दिल्याप्रकरणी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर येथील राजश्री शाहु छत्रपती विद्यानिकेतनसाठी कबड्डी व कुस्ती मॅट पुरवठा करण्यासाठी निविदा काढली असता अलोक यादव यांनी निविदा भरली. त्यांनी निविदेप्रमाणे कबड्डी व कुस्तीचे मॅट पुरवठा न करता खराब दर्जाच्या मॅटचा पुरवठा केला. या मॅटबाबत शंका आल्याने जिल्हा परिषदेने त्या गुणवत्तेप्रमाणे पुरविल्या आहे की नाही, याची चौकशी करुन अहवाल पाठविण्याविषयी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे साहित्य पाठविले. प्राचार्यांनी पुरवठा केलेल्या मॅट्स गुणवत्तेप्रमाणे पुरवठा केल्याबाबतचा चुकीचा अहवाल जिल्हा परिषदेला दिला. हा अहवाल योग्य समजून जिल्हा परिषदेने पुरवठादार अलोक यादवला १५ लाख ९९ हजार रुपये दिले.

काही दिवसांनी पुरवठादाराने कबड्डी व कुस्तीचे खराब मॅट पुरवून सरकारचे १५ लाख ९९ हजार रुपये लाटल्याचे प्रकरण उजेडात आले. या प्रकरणावरुन जिल्हा परिषदेमध्ये गेल्या काही महिन्यापासून चर्चेचे रान उठले. स्थायी समितीमध्ये याबाबत चर्चा होऊन संबंधित पुरवठादार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या चर्चेअंती जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांचा अभिप्राय घेण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी संबंधित पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश दिला. सध्या पुरवठादार आणि प्राचार्य यांचा तपास पोलीस करत आहेत.