कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोना संक्रमण वाढू लागल्याने स्थानिक पातळीवर संचारबंदीचा निर्णय घेतला जात असताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी अशा संचारबंदीची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. दैनंदिन व्यवहार सुरू राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. करोनाबाधित संख्या वीस हजाराच्या दिशेने जात आहे. हे वाढते प्रमाण पाहून स्थानिक पातळीवर संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कागल, गडहिंग्लज, राधानगरी, पन्हाळा आदी तालुक्यात तसेच काही गावांमध्ये याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

संभाजीराजेंचा विरोध

करोनाची अशी परिस्थिती एकीकडे असताना खासदार संभाजीराजे यांनी मात्र किती दिवस जनता कर्फ्यू संचारबंदी सुरू ठेवणार, असा प्रश्न उपस्थित केला. करोनाबाबत लोकांमध्ये शासन,प्रशासनाने अधिक जागृत यांनी गरजेचे आहे. जेणेकरून लोकांना दवाखान्यात जाण्याचीही गरज पडू नये. व्यवसाय बंद ठेवून ठेवल्यामुळे उत्पन्न घटत आहे. त्याचा सामान्यांनाही त्रास होत आहे. देशाचा जीडीपी २३ उणे झाला आहे. अशा परिस्थितीत जनता संचारबंदी गरज नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात करोना बाबत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले.

जिल्हा परिषदेतही प्रवेश बंद

दरम्यान, कोल्हापूर महापालिकेपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्येही अभ्यागतांना मंगळवारपासून प्रवेश बंद करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह काही अधिकारी व कर्मचारी यांना करोनाची बाधा झाली आहे. यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कर्मचारी संघटनांनी मित्तल यांना निवेदन देऊन जिल्हा परिषदेतील लोकांना प्रवेश रोखण्याची मागणी केली. त्यानुसार मित्तल यांनी परिपत्रक काढून अभ्यागतांना जिल्हा परिषदेत प्रवेश बंदी करण्यात येत असल्याचे सांगितले.