11 December 2017

News Flash

कोल्हापुरात सर्वच पक्षांची परीक्षा

केंद्र व राज्यात सत्ता आल्यामुळे जिल्ह्यात नाममात्र असलेली भाजप चांगलीच मजबूत होऊ लागली आहे.

दयानंद लिपारे, कोल्हापूर | Updated: January 24, 2017 1:28 AM

चंद्रकांत पाटील यांच्या बेरजेच्या राजकारणाची कसोटी; मित्रपक्ष सोबत नसल्याने विजयाचे आव्हान

‘कोल्हापूर जिल्हा परिषदेवर झेंडा आमचाच’ असा दावा करणाऱ्या सर्वपक्षीयांच्या राजकीय ताकदीची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. नगरपालिका निवडणुकीत ताकद वाढलेली भाजप, जिल्हा परिषदेतील सत्ता आपल्याकडेच कायम ठेवण्याचा दावा करणारी काँग्रेस , तळागाळात पक्षाची बांधणी भक्कम असल्याचे सांगणारी राष्ट्रवादी, सर्वाधिक आमदारांमुळे सर्वाधिक बलवान आम्हीच असे समर्थन करणारी शिवसेना आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यात रुजलेले आम्हीच खरे सशक्त असा दावा करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटना.. अशा दाव्या-प्रतिदाव्यांमुळे नेमकी ताकद कोणाची हे या निवडणुकीत ठरणार आहे. सत्तेचे दावे करणाऱ्या पक्षांमध्ये असणारे अंतर्गत मतभेद, सोयीच्या राजकीय सोयरिकी, बदलते राजकीय संदर्भ यामुळे ही राजकीय लढाई तुल्यबळ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर प्रदीर्घ काळ काँग्रेसचे वर्चस्व आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी जवळीक साधून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी गेली पाच वष्रे सत्ता काबूत ठेवली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या वाटणीवरून सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात बिनसले. त्याची परिणती म्हणजे विधान परिषद निवडणुकीत या दोन दिग्गज नेत्यांमध्ये झालेली लढत. पाटील यांनी या निवडणुकीत बाजी मारली असली तरी पराभवामुळे दुखावले गेलेल्या महाडिकांनी नगरपालिका निवडणुकीत आपल्या पराभवास कारणीभूत असलेल्यांचा काटा काढला. आता ते भाजप, जनसुराज्य शक्ती पक्षाच्या मदतीने ग्रामीण भागातील विरोधकांना नमविण्याच्या तयारीत आहेत. निवडणूक तोंडावर असताना काँग्रेस पक्षातील जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, सतेज पाटील, जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे यांच्यातील मतभेद कायम आहेत. हा बदलता राजकीय संदर्भ पाहता जिल्हा परिषदेवरील काँग्रेसचा तिरंगा फडकण्याचा दावा प्रत्यक्षात किती उतरणार हा प्रश्न आहे.

केंद्र व राज्यात सत्ता आल्यामुळे जिल्ह्यात नाममात्र असलेली भाजप चांगलीच मजबूत होऊ लागली आहे. नगरपालिका निवडणुकांत नऊपकी पाच पालिकांवर सत्ता आणत या पक्षाने आपली ताकद दाखविली आहे. जिल्हा परिषद हे या पक्षाने आगामी लक्ष्य ठेवले असून जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे, ताराराणी आघाडी यांना सोबत घेऊन चाळीसहून अधिक जागांवर विजय मिळविण्याचा निर्धार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. बेरजेच्या राजकारणात ते कितपत यशस्वी ठरणार आणि भाजपची ग्रामीण भागातील नेमकी ताकद किती,  याचा अंदाज या निवडणुकीत येणार आहे. भाजपचे मित्रपक्ष असलेले शिवसेना, स्वाभिमानी, रासप आदी पक्ष या निवडणुकीत सोबत नसल्याने त्याचा फटका बसणार का, या विषयीही कुतूहल आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला माफक यश मिळाले असले तरी त्यानंतर झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती, शेतकरी बाजार या प्रमुख सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण झाले. या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप, शिवसेना, काँग्रेस अशी सोयीची राजकीय सोयरीक करून जिल्हा परिषद काबीज करण्याचे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली आहे. पण, आघाडी कोणाशी करायची यावरून राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यातील धुसफुस ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत चव्हाटय़ावर आली असल्याने त्याचा फटका पक्षाला बसण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणुकांमध्ये दहापकी सहा जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. यामुळे सेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील दौऱ्याच्या वेळी आगामी निवडणुकीत सर्व दहा जागांवर विजय प्राप्त करण्याच्या दिशेने प्रयत्न व्हावेत, असा आदेश दिला. विधानसभा निवडणुकीचे यश हे तत्कालीन नव्हते तर त्याला जनमानसाचे पाठबळ होते हे सिद्ध करण्याची वेळ या निवडणुकीत सेनेवर आली आहे. पक्षांतर्गत मतभेदांना पुरून उरून सेनेचा भगवा फडकविणे हे कडवे आव्हान असून त्यात पक्ष कितपत यशस्वी होतो, यावर पक्षाचे आगामी काळातील राजकारणही अवलंबून असणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मूळ ग्रामीण भागात खोलवर रुजले आहे. या साखरपट्टय़ात ऊस उत्पादक शेतकरी हा त्यांचा हुकमी मतदार. स्वाभिमानी सत्तेत सहभागी झाल्यापासून त्यांची आक्रमकता कमी होऊ लागल्याची टीका होत आहे. अशातच खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील स्वाभिमानीच्या मतदारांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. अशा स्थितीत गावगाडय़ावरील पक्षाचे अस्तित्व दाखवून देणे हे शेट्टी यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. नोटाबंदीचा खरा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याला वाचा फोडायची की सत्ताधाऱ्यांप्रमाणे समर्थन करायचे याचा मोठा पेच स्वाभिमानीच्या नेतृत्वासमोर आहे. तो सोडविण्यात ते कितपत यशस्वी होतात यावर त्यांचे लोकसभेचे गणितही अवलंबून आहे.

एकहाती यशाची शक्यता धूसर

  • प्रत्येक पक्षांच्या जमेच्या बाजू व उणिवा लक्षात घेता जिल्हा परिषद निवडणुकीत एकतर्फी, एकहाती यश मिळविणे हे कोल्हापूर जिल्ह्यात सहज शक्य नाही. सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावून मिनी मंत्रालयावर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी सर्वत्र टोकदार लढाई अटळ आहे.

कोल्हापूर जिल्हा बलाबल : काँग्रेस ३०, राष्ट्रवादी १६, स्वाभिमानी ५, शिवसेना ६ , भाजप ३, जनसुराज्य ६, काँग्रेसप्रणीत आघाडी ३.  एकूण – ६९.  काँग्रेस,स्वाभिमानी, काँग्रेसप्रणीत आघाडी ५ वष्रे सत्तेत.

First Published on January 24, 2017 1:26 am

Web Title: kolhapur zp election