मी राज्याचा मुख्यमंत्री असताना महिलांच्या प्रगतीसाठी महिला धोरण अमलात आणले. पण त्यामुळे आम्हाला सत्ता गमावण्याची किंमत चुकवावी लागली. अपयशाचा शोध घेता दलितांना सत्तेची पदे जात असल्यामुळे गावोगावचे परंपरागत सत्ताधीश दुखावले गेल्याचे आढळून आले. हे पाहता राजर्षी शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी त्यांच्या संस्थानात आरक्षणाचा निर्णय घेऊ न त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी केली होती. दृष्टा लोकराजा कसा असतो हे शाहू महाराजांनी कृतिशील आचरणाने सामाजिक परिवर्तन देशाला दाखवून दिले आहे, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्याच्या थोरवीचे वर्णन रविवारी येथे केले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकाचे लोकार्पण सोहळ्यात पवार प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सामाजिक परिवर्तनाचे धोरण महत्त्वाचे असले तरी ते तडीस नेण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते, असा उल्लेख करीत पवार यांनी आपल्या भाषणात राजकीय टीकाटिपणी न करता पूर्णत: लोकराजा शाहू महाराजांच्या जीवनातील घटना – घडामोडींचा वेधक आढावा घेत त्यांच्या सामाजिक कार्याची महती विशद केली.  नव्या पिढीला समतेच्या, आधुनिकतेच्या विचारांची प्रेरणा या समाधी स्मारकाच्या माध्यमातून मिळेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांचे विचार पुढे नेण्याचे समर्थ काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कृतीतून केले आहे. त्यांचा समतेचा विचार जगात पोहोचविण्यासाठी देश पातळीवरील मोठा कार्यक्रम करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मान्यवरांसह सामान्यांचीहा गर्दी

शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळा खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाला. पालकमंत्री सतेज  पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री दत्तात्रय सावंत,  पी.एन.पाटील, प्रकाश आवाडे, चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील,  राजेश पाटील, राजू आवळे तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

उत्साहाला उधाण

समाधीस्थळावर सकाळपासून गर्दी झाली होती. शाहिरी पोवाडयमंतून शाहूंच्या कार्याची थोरवी सांगितली जात होती. मिरवणुका, मर्दानी खेळांनी गर्दीचे लक्ष वेधून घेतले. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि शाहू सलोखा मंचच्या वतीने समता फेरीचे आयोजन करण्यात आले होते.