करवीरनगरीत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनाच्या शुक्रवारच्या पहिल्याच दिवशी नगरसेवकांनी प्रशासनाच्या नियोजनावर टीकेची झोड उठवली. स्थायी समितीच्या बठकीत गळतीच्या मुख्य समस्येवरून प्रशासनाला धारेवर धरले. १५ दिवसांत गळती काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. तर नगरोत्थान योजनेतील आरई इन्फ्रा योजनेच्या कामावर सदस्यांनी जोरदार टीका केल्यावर प्रशासनाने कंपनीने काम सुरू न केल्यास काळय़ा यादीत टाकण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
आरई इन्फ्रा या ठेकेदाराने अजूनही आपली कामे सुरू केलेली नाहीत. पावसाळय़ापूर्वी काम होणे गरजेचे आहे. वारंवार सूचना, नोटिसा देऊनही ठेकेदाराने काम सुरू केलेले नाही. २१ मार्चला काम सुरू करण्यात येणार होते. मात्र अद्याप काम सुरू नाही. या ठेकेदारास तातडीने ब्लॅक लिस्ट करावे, अशी मागणी प्रतिज्ञा निल्ले, सत्यजित कदम यांनी केली. त्यावर प्रशासनाने ठेकेदाराने २१ मार्चपूर्वी काम सुरू करण्याची ग्वाही दिली होती. त्याची दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आली असून, ५ एप्रिलपर्यंत काम सुरू करण्याबाबत अंतिम नोटीस बजावण्यात येईल. तरीही काम सुरू न झाल्यास ब्लॅक लिस्ट करण्याची कार्यवाही करण्याचे सांगितले.
उपनगरामध्ये मोठय़ा प्रमाणात गळत्या आहेत. पाणी बंद काळात लिकेज काढण्यात येणार होतते, त्याचे काय झाले. साने गुरुजी वसाहतीमधील काही भागांत २४ तास पाणी सुरू राहते. त्या ठिकाणी व्हॉल्व्ह टाकणे गरजेचे असल्याबाबत दीपा मगदूम, मनीषा कुंभार यांनी विचारणा केली. त्यावर आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मोठी लिकेजेस काढण्यासाठी मटेरियल मागवले आहे. १५ दिवसांत साहित्य उपलब्ध होईल असे प्रशासनाने सांगितले. तर पाणीकपातीच्या काळात टँकर भाडय़ाने घेण्याबाबतचे नियोजन केले आहे का, असा सवाल करीत तसा प्रस्ताव का सादर केलेला नाही. महापालिकेचे टँकर कमी आहेत. नागरिकांची गरसोय होता कामा नये, अशी मागणी सत्यजित कदम यांनी केली. त्यावर प्रशासनाने महापालिकेचे ६ टँकर असून, अजून १० टँकर भाडय़ाने घ्यावे लागणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव सादर करून त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यास महापौरांना विनंती केली असल्याचे सांगण्यात आले.