राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष असलेल्या मुश्रीफ यांना या वेळच्या निवडणुकीत मतदार संघ सोडून अन्यत्र जाता आले नाही; यातच त्यांचा पराभव आहे. हिंमत असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊ न माझ्यासारखे थेट अपक्ष लढावे, असे आव्हान शाहू समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिले.

यातूनच मुश्रीफ यांना जनतेचे हृदय कोणी जिंकले आहे याचे उत्तर त्यांना मिळेल. विधानसभेची उमेदवारांची मतांची आकडेवारी पाहता मुश्रीफ विजयाचा आनंद घेऊ  शकत नाहीत. हीच मोठी शोकांतिका आहे, असा चिमटाही घाटगे यांनी पत्रकार परिषदेत काढला.

घाटगे म्हणाले, की मी अपक्ष लढून ९० हजार मतांचा टप्पा गाठला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे, जनता दल आणि काही दिवसांपूर्वी वकिली केली त्या तालुक्यातल्या नेत्याला (संजय मंडलिक) बाजूला ठेवून मुश्रीफ हे लढाईची तयारी दाखवतील का? असा सवाल त्यांनी केला.

ते म्हणाले, की माझ्यावर कसा अन्याय झाला यासाठी मी निवडणुकीनंतर आकडेवारीच्या आधारे खासदार संजय मंडलिक यांना काही प्रश्न विचारले होते. परंतु मंडलिक यांची वकिली करताना मुश्रीफ यांनी उत्तरे देण्याचे कारणच काय? यावरून जनतेला निवडणुकीत काय झाले ते समजले आहे.

दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांना राजकारणात आणले. ते संस्थापक असलेल्या शाहू कारखान्याचा कारभार बरोबर नसल्याचा साक्षात्कार आज त्यांना झाला आहे. यातूनच त्यांनी निवडणूक लढवण्याची भाषा केली आहे. मग यापूर्वी मंडलिक कारखान्याची दोन वेळा निवडणूक लावणाऱ्या मुश्रीफांना मंडलिक यांचा कारखान्यातील कारभार बरोबर वाटत नव्हता काय? शाहू साखर कारखान्याची निवडणूक लावण्याची भाषा करणाऱ्या मुश्रीफांना आवाहन करतो की तुम्ही पळ काढू नका, असे आव्हान घाटगे यांनी दिले.