उत्पादकतेत १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होणार

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील १० हजारावर एकर क्षेत्रात यंदाच्या खरीप हंगामात संपूर्ण तालुक्यात १०० टक्के भात पीक बीज प्रक्रिया करून लागवड प्रक्रिया मोहीम राबवली जात आहे. यामध्ये १० हजारावर शेतकरी सहभागी होणार आहेत. यामुळे उत्पादकतेत १० टक्के पेक्षा अधिक वाढ होत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

देशातील सर्वाधिक शेत पीक म्हणून भाताकडे पहिले जाते. कोल्हापूर जिल्ह्यच्या पश्चिम भागात भाताचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. पेरणी करताना बीज प्रक्रिया करणे लाभदायक असते.त्याकडे बऱ्याचदा शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन गगनबावडा तालुक्यातील १० हजारावर एकरात ‘खरीप हंगाम १०० टक्के भात बीज प्रक्रिया मोहीम’ राबवली जात असून दहा हजार शेतकरी सहभागी होत आहेत.कृषि सहसंचालक उमेश पाटील,प्रकल्प संचालक आत्मा सुनंदा कुऱ्हाडे,जिल्हा कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात येत असल्याचे तालुका कृषि अधिकारी गजानन खाडे यांनी सांगितले.

यापूर्वी कृषी विभागाच्यावतीने भात बीज प्रक्रिया निवडक शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे वा त्यांच्या बांधावर केली जात असे. पण सह्यद्री घाटात सामावलेल्या गगनबावडा तालुक्यातील डोंगराळ भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचून भात बीज प्रक्रियेची निविष्ठा पोहोचवली जाणार आहे. इतक्या व्यापक प्रमाणात ही मोहीम राबवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यासाठी शासनाने निधी मंजूर केला असून मान्यताप्राप्त कृषी संशोधन केंद्रातून त्याची पुरेशी खरेदी केली असून ते वापरात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अशी असते प्रक्रिया

जैविक पद्धतीने अ‍ॅझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची बीज प्रक्रिया केली जाते. एक एकर क्षेत्रासाठी सुमारे दहा ते पंधरा किलो बियाणे जातीनिहाय लागत असते. या बियाणावर कृषी विभागाच्या शिफारशीनुसार विशिष्ट द्रावण शिंपडले जाते. ते काहीवेळ सुकून त्याची पेरणी केली जाते. या प्रक्रियेतून उत्पादकता वाढीस लागते, असे आत्माचे प्रकल्प अधिकारी पराग परीट यांनी सांगितले.

उत्पादकतेत वाढ

भात बीज प्रक्रिया ही लाभदायक आहे. यामध्ये बुरशीनाशकाचा वापर केला जात असल्याने रोग प्रतिबंधशक्ती वाढते. नत्र स्थिरीकरणाचे काम केले जाते. रासायनिक खताच्या वापरात बचत झाल्याने उत्पादन खर्चही कमी होतो. उत्पादकतेत किमान दहा टक्के वाढ झाल्याचे निष्कर्ष आहेत, असे येथील कृषी महाविद्यालयातील कृषी विस्तार वेत्ता डॉ. अशोक मिसाळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.