News Flash

फडणवीस सरकार शेतकरीविरोधी-चव्हाण

कृषी विषयक निश्चित धोरणाचा अभाव

पृथ्वीराज चव्हाण (संग्रहित छायाचित्र)

कृषी विषयक निश्चित धोरणाचा अभाव

राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. कर्जमाफीच्या प्रश्नात अद्याप यंत्रणा कोलमडली आहे. दीड लाखांची थकबाकी आम्हाला मान्य नाही. हजारो शेतकरी आत्महत्या करीत असताना कृषी विषयक निश्चित धोरण ठरवता न येणारे हे सरकार शेतकरीविरोधी आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

दिडनेर्ली (ता. करवीर) येथे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त आयोजित सद्भावना    दौड व शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

शेतकरी हिताच्या धोरणामध्ये जाणीवपूर्वक बगल देऊन उद्योगपतींना आधार देणाऱ्या युती शासनाकडून जनतेचे हित होणार नाही. जनहिताच्या धोरणामध्ये भ्रष्टाचारी कारभाराने विविध योजनांना खो बसल्याने राज्याचा विकास खुंटला आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी सरकारला वठणीवर आणण्यासाठी युवकांनी संघटितपणे सरकारला जाब विचारला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

माहिती तंत्रज्ञानात भारत देश स्वयंपूर्ण बनला आहे. यामागे राजीव गांधी यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या काळात अर्थव्यवस्था बळकट झाली. त्यामुळे काँग्रेसच्या काळात देशाच्या चौफेर विकासाला गती मिळाली. मात्र काँग्रेसने क्रांतिकारी नेत्यांच्या नावाने सुरू केलेल्या विविध योजनामध्ये नेत्यांची नावे रद्द करण्याचा कुटील डाव भाजपने केला आहे, असेही चव्हाण म्हणाले.

काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक रवींद्र सिंह म्हणाले, केंद्र सरकार भावनिक राजकारण करून राजकीय स्वार्थ साधत आहे. काँग्रेसने माहिती तंत्रज्ञानात देशाला अव्वलस्थानी पोचवले. परंतु सध्याच्या भाजप सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक मंदावली आहे. त्यामुळे लाखो युवक बेकार झाले आहेत. जनतेने फसव्या धोरणापासून सावध राहावे. माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, माहिती तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न राजीवजींनी बाळगले होते. त्यामुळे भारताच्या संगणक क्रांतीचे जनक म्हणून (स्व.) राजीव गांधी ओळख अजरामर झाली आहे.

संयोजक पी. एन. पाटील म्हणाले, राजीव गांधी यांनी सत्तेच्या काळात जनताभिमुख विविध योजना राबवून ग्रामविकासात क्रांती केली. केंद्राचा निधी थेट ग्रामपंचायतींना देऊन ग्रामविकास करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे काँग्रेसच्या काळातच खेडय़ांचा विकास झाला आहे. जि.प. सदस्य राहुल पाटील, राजेश पाटील यांनी स्वागत केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2017 12:46 am

Web Title: prithviraj chavan comment on devendra fadnavis 4
Next Stories
1 कोल्हापुरातील गटबाजीकडे ‘मातोश्री’चे दुर्लक्ष
2 प्राधिकरणाच्या माध्यमातून कोल्हापूरचा संतुलित विकास?
3 अमित शहा यांनी भविष्य सांगण्याचा व्यवसाय सुरू केला काय?
Just Now!
X