कोल्हापूर शहर महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा विषय पुन्हा एकदा आंदोलनाच्या चक्रात अडकला आहे. हद्दवाढ समर्थक व विरोधी गोटातून आंदोलन – प्रति आंदोलनाचा आक्रमक सूर शनिवारी उमटला. हद्दवाढ समर्थक रविवारी महापालिकेसमोर उपोषण करणार आहेत, तर हद्दवाढ विरोधी कृती समितीच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये १८ गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्याचा विषय अनेक वष्रे गाजत आहे. शहरातून हद्दवाढ होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, ग्रामीण भागातील जनता, लोकप्रतिनिधी यांच्या विरोधामुळे हद्दवाढ रेंगाळली आहे.
गेल्या महिन्यात हद्दवाढीची अधिसूचना निघणार असल्याच्या चच्रेला उधाण आले होते. त्यावर समर्थक व विरोधी गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दोन्ही बाजूकडून बंदचे आयोजन करण्यात आले होते. हा विषय विधानसभा अधिवेशनातही गाजला होता.
लोकप्रतिनिधींनी हा विषय उपस्थित केल्यावर मुख्यमंत्री. फडणवीस यांनी संयुक्त बठक घेण्याचे मान्य केले होते. या बठकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या बठकीत या संदर्भात येत्या पंधरा दिवसात हद्दवाढीच्या समर्थक व विरोधक अशा दोन्ही बाजूच्या सर्व संबंधितांशी वैयक्तिक चर्चा करून, जनमत समजून घेऊन, अभ्यासकांचे मत आजमावून घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. काल फडणवीस यांना हद्दवाढ समर्थक विमानतळावर भेटले. त्यांनी ४ दिवसांत संयुक्त बठक घेण्याचे मान्य केले.
या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा समर्थक व विरोधक यांनी दबावाचा भाग म्हणून आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. समर्थक गटाची पत्रकार परिषद झाली असता आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्या रविवारी महापालिकेसमोर उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
तर, याला प्रत्युत्तर देत विरोधी गटाचे आमदार चंद्रदीप नरके यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली. या घडामोडी पाहता हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा वादाच्या चक्रात सापडताना दिसत आहे.