कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. तासभर पाऊस झाला. ऊस पिकासाठी समाधानकारक असणाऱ्या पावसाने सोयाबीन, भुईमूग व भात उत्पादक शेतकऱ्यांना आधार मिळाला. गेल्या महिनाभर उकाडय़ाने त्रस्त केले असल्याने आज जोरदार पाऊस पडेल अशी आशा वाटत होती, पण ती फोल ठरली. बळीराजा मात्र पावसामुळे समाधानी होता. जिल्हाच्या काही भागात केवळ अंधारून आले. पावसाने हुलकावणी तर दिलीच, उलट उकाडा आणखी वाढला.
सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने उन्हाच्या तडाख्याने हैराण नागरिकांना पावसाच्या सरीने काहीसा गारवा मिळाला. पाऊण तास झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. उन्हाचा तडाखा वाढत असून, कोल्हापूरचा पाराही ४० वर पोहोचला होता. त्यामुळे उष्मा वाढला होता. उष्म्यामुळे दुपारच्या वेळी रस्तेही निर्मनुष्य होत आहेत. दोन दिवसांपासून कोल्हापुरात अधूनमधून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवली जात होती. दुपारनंतर पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागला. सायंकाळनंतर ढगाळ वातावरण झाले. सहाच्या सुमारास पावसाचे आगमन झाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी खरीपपूर्व कामामध्ये व्यस्त आहे. जिल्हामध्ये सोयाबीन पेरणी मे महिन्याच्या मध्यास केली जाते, त्यास हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. उसाचे पीक पाण्याअभावी वाळू लागले आहे. थोडासा पाऊस आता त्याला मोठा वाटू लागला आहे. त्यामुळे आजच्या पावसाने शेतकरी खूश झाला नसला तरी त्याच्या चेहऱ्यावरील आठी कमी झाली. भाताची धूळवाफ पेरणीची तयारी सुरू आहे. मान्सूनपूर्व पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतेत होता. अशा शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा पाऊस उपयुक्त असल्याचे, कृषी उपसंचालक सुरेश मगदूम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना गुरुवारी सांगितले.