सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी यांचे नेतृत्व करण्याचे ढोंग करून आजपर्यंत त्यांना फसवत आलात. आता तर त्यांना वाऱ्यावर सोडून राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी बारामतीचे उंबरे झिजवायला लागलात. यातूनच आमदारकीसाठी राजू शेट्टी यांनी ताळतंत्र सोडले असल्याचे दिसते, असा पलटवार भाजपाने बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर केला.

धारावीतील करोना नियंत्रणावरुन सुरु असलेल्या श्रेयवादात राजू शेट्टी यांनी उडी घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. तसेच संघाने राज्यभर करोना नियंत्रणासाठी काम करावे अशी उपहासात्मक टीका केली होती. त्याला आज भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव देसाई यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.

“देशामध्ये प्रत्येक आपत्ती वेळी रा. स्व. संघाचे स्वयंसेवक प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता झोकून देऊन काम करतात. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धारावी परिसरातील संघ स्वयंसेवकांनी केलेल्या कामाची माहिती दिली असताना जनतेने नाकारलेल्या शेट्टी यांना ती माहिती का झोंबली? हे अनुत्तरीतच आहे. संघ स्वयंसेवकांनी राज्यभर काम करावे, नागपूर मुख्यालयात काम करावे असे उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा करोना महामारीच्या काळात त्यांनी काय काम केले? हे एकदा स्पष्ट करावे,” असा सवालही त्यांनी केला.

राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी आपण आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचे नाव बारामतीला सांगाल अशीच सर्वांची अपेक्षा होती. परंतू, संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना बाजूला ठेऊन सत्तेच्या मोहापायी स्वतःचेच नाव पुढे रेटण्यात आपण धन्यता मानली. सत्तेतील पदाशिवाय तुम्ही जगूच शकत नाही हे यावरुन सिद्ध होते, असा टोलाही त्यांनी शेट्टी यांना लगावला.