शिवसेनेचे धैर्यशील माने यांचा दणदणीत विजय

हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे नवखे उमेदवार धैर्यशील माने यांनी त्यांच्यावर लाखाहून अधिक मताने मात केली. माने घराण्यातील तिसरे खासदार म्हणून धैर्यशील माने पुढे आले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण करणाऱ्या शेट्टी यांना राजकारणाच्या शिवारातून बाहेर पडावे लागले.

खासदार राजू शेट्टी यांच्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदार संघ राज्यभरात चर्चेत होता. गेल्या वेळी महायुतीच्या वतीने निवडणूक लढवून शेट्टी हे दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले होते. महायुतीच्या तंबूतून बाहेर पडून शेट्टी यांनी महाघाडीशी जवळीक साधून निवडणूक लढवली. या वेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले युवा नेते धैर्यशील माने होते. प्रारंभी या लढतीत शेट्टी हे सहजपणे बाजी मारतील असे चित्र होते. पण अखेरच्या टप्प्यात त्याला टोकाची कलाटणी मिळाली. माने यांच्या दृष्टीने अनेक घटक पथ्यावर पडले. शेट्टी यांनी साखर कारखानदारांशी साधलेली जवळीक, नवमतदारांनी माने यांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, माने यांची मराठा जात आणि त्यावरून केलेला बहुजन समाजाच्या अस्मितेचा मुद्दा यामुळे माने यांची बाजू अधिकाधिक भक्कम होत गेली. त्याचा प्रत्यय आज मतमोजणी वेळी दिसून आला.

हा तर तरुणाईचा विजय – माने

निकालानंतर धैर्यशील माने म्हणाले ‘युवा जनतेने युवा नेतृत्वाला विजयी करून आपल्या मनातील खासदार बनविण्याचे मूर्तिमंत उदाहरण घालून दिले आहे. माझ्या विजयाला साहाय्यभूत ठरलेल्या तरुणांसह समस्त मतदारांच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन’. उत्तम लोकप्रतिनिधी कसा असतो हे कृतीतून दाखवून देईन सांगत मानेंनी शेट्टी यांच्यावर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, ‘मी म्हणेल ती पूर्वदिशा असे म्हणत मतदारांना गृहीत धरण्याचे त्यांचे गणित पूर्णत: चुकले. अयोग्य मार्गाने जाणाऱ्या लोकप्रतिनिधींची कोणती अवस्था होते हे निकालातून मतदारांनीच दाखवून दिले आहे,’ असा टोला माने यांनी शेट्टींना लगावला.