कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीसाठी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा दिला. हा विरोधी आघाडीला धक्का आहे.

पत्रकार परिषदमध्ये शेट्टी म्हणाले, राज्यात दुधाला सर्वाधिक दर देणारा गोकुळ संघ आहे. गोकुळ विरोधात यापूर्वी आंदोलन केले तेव्हा दुधाला दर वाढवून मिळाला. गोकुळ बहुराज्य होऊ नये ही आमची भूमिका आहे. तसा शब्द सत्ताधारी गटाने दिला आहे. टाळेबंदी काळात अन्य संघ दूध नाकारत असताना गोकुळने त्यांना शेतकऱ्यांना न्याय दिला. महाविकास आघाडीचे सदस्य असताना सत्ताधारी गटाला पाठिंबा कसा, या प्रश्नावर शेट्टी यांनी सत्ताधारी गटात काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील हे नेतृत्व करीत असल्याकडे लक्ष वेधले.

शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी हे सत्तारूढ आघाडी सोबत आले आहेत. त्याचा परिणाम मतदान आणि निकालातून दिसेल, असे महादेवराव महाडिक म्हणाले. गोकुळ निवडणुकीत अध्यक्ष निवडीची औपचारिकता उरली आहे असे विरोधक म्हणत आहेत. मंत्री, खासदार विरोधकांकडे असले तरी ठरावधारक मतदार आमच्या सोबत असल्याने ५०० मताधिक्कय़ाने सत्तारूढ आघाडीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास माजी खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

अशोक चराटी यांचे मतपरिवर्तन

आजरा सूतगिरणीचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक, भाजपचे अशोक चराटी यांनी विरोधकांना पाठिंबा देण्याची भूमिका बदलली आहे. पालक मंत्री सतेज पाटील घरी आल्याने पाहुणचार केला. म्हणजे कोणाला पाठिंबा दिला असे होत नाही, असे म्हणत त्यांनी सत्ताधारी गटासोबत असल्याचे सांगितले.