दयानंद लिपारे

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात  उमेदवार कोण आणि ते यंदा हॅट्ट्रिक करणार का, हे दोन महत्त्वाचे मुद्दे बनले आहे. डावी आघाडी, महायुती यांचे पाठबळ घेऊन दोनदा लोकसभेत पोहचलेले शेट्टी आता काँग्रेस- राष्ट्रवादीशी जवळीक साधताना दिसत आहेत. आजवर ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांचीच मदत या वेळी त्यांना मिळणार असली तरी हे समीकरण त्यांना कितपत लाभदायक ठरेल, याबाबत साशंकताच आहे.

सत्तेत असूनही ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा ही शेट्टी यांची जमेची बाजू. वस्त्रोद्योग, वारणा पाणी योजना यासारखे काही मुद्दे त्यांना त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार कोण हे निश्चित झालेले नसले तरी शरोळचे आमदार उल्हास पाटील आणि शिवबंधन बांधलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांची नावे  आघाडीवर आहेत. त्यांचा चळवळीतील नेतृत्व असलेले शेट्टी यांच्याशी सामना कसा होणार हा मुद्दा आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टी यांच्यामुळे चर्चेत आहे. ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीने चव्हाटय़ावर आणण्यात शेट्टी यशस्वी ठरले, त्याआधारे त्यांनी जिल्हा परिषद ते लोकसभा असा राजकीय प्रवासही केला. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी डावे, समाजवादी पक्षांची साथ मिळवून दोनदा खासदार झालेल्या राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांना पराभूत केले. तर, गेल्या वेळी भाजप-शिवसेना महायुतीतून काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना पराभूत केले होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे खासदार असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कडवटपणे आव्हान देणाऱ्यांमध्ये शेट्टी आघाडीवर राहिले.

या वेळी दोन्ही काँग्रेसने शेट्टी यांच्या पाठीशी राहण्याचे ठरवले आहे. शेतकरी हाच शेट्टी यांचा राजकारणाचा मूलाधार राहिला आहे. स्वाभाविकच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आवाज उठवण्याचा त्यांचे प्राधान्य राहिले आहे. देशातील १२५ पेक्षा अधिक शेतकरी संघटनांचा नवी दिल्लीत भव्य मोर्चा काढून त्यांनी आपले स्थान राष्ट्रीय पातळीपर्यंत उंचावले आहे. हे करीत असताना मतदारसंघावरील मांड ढिली झाली आहे. मात्र, विकास केल्याचा त्यांचा दावा कायम आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपयांचा फायदा थेट शेतकऱ्यांच्या पदरात पडला आहे. कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे, रेल्वे विद्युतीकरण, केंद्रीय मार्ग निधी योजनेतून मोठय़ा प्रमाणात रस्ते, पूल, रेल्वे उड्डाण पूल यांची निर्मिती, क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम, खेडय़ांचे विद्युतीकरण अशी अनेक कामे केली आहेत. वस्त्रोद्योगाचे अनुदान मिळवून देण्यापासून त्याचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याचा त्यांचा दावा आहे. याच वेळी विरोधकांकडून मात्र शेट्टी हे विकासाची कामे करण्यात अपयशी ठरल्याची टीका केली जाते. मतदारसंघात शेतीच्या बरोबरीने औद्योगिक विस्तार मोठा आहे, पण उद्योग आणि उद्योजकांना शेट्टी यांनी वाऱ्यावर सोडल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातो.

गेली २५ वर्षे शेतकरी, गोरगरीब, व्यापारी, कामगार, मजूर आदी वर्गासाठी अविरत लढा दिला असल्याची जाणीव असल्याने जनतेने दोन वेळा आपल्या हक्काचा प्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये पाठवले आहे. संसदेमध्ये सगळ्याच वर्गातील लोकांची प्रश्न मोठय़ा पोटतिडकीने मांडलेली आहेत. सत्ताधाऱ्यांवर प्रहार करून त्यांच्यावर वचक ठेवण्याचे काम केले. संसदेमध्ये मराठा, लिंगायत, धनगर मुस्लीम समाजाचे आरक्षण, ऊस दर, दूध दर, कर्जमुक्ती, दुष्काळ, कामगारवर्ग, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन, वस्त्रोद्योग, गोरगरिबांना पेन्शन योजना, व्यापार, जीएसटी-नोटंबदीविरोधात, महिला सबलीकरण, शिक्षण, नोकरी, सामाजिक प्रश्न, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आदी ५४० प्रश्न मांडले आहेत. जनहितासाठी काम केले असल्याने विजयाची चिंता नाही.

– राजू शेट्टी, खासदार

विकासाच्या बाबतीत अपयशी खासदार म्हणून राजू शेट्टी यांच्याकडे पाहावे लागेल. वस्त्रोद्योग, चांदी उद्योग, बाजारपेठ यांच्या प्रश्नांची त्यांना समज नाही. त्यांना ताकद मिळवून देणे गरजेचे असताना याबाबत त्यांनी चाकर शब्दही काढला नाही. उसाचा प्रश्न वगळता काहीही केलेले नाही. साखर कारखानदार आणि त्यांची मिलीभगत आहे. कारखानदार वजनात काटा मारतात म्हणून काटा उभारणार म्हणणाऱ्या शेतकरी नेत्याला याचा विसर का पडला आहे. त्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे हा मतदारसंघ दहा वर्षे मागे गेला आहे.

– धैर्यशील माने, शिवसेना</p>